नगरतालुका | १९ जानेवारी | दिपक शिरसाठ
(public issue) येथील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या निंबळक रेल्वे उड्डाणपुलासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार हे गेल्या सात वर्षांपासून सतत पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या या पाठपुराव्याला आज अखेर यश आले. केंद्रीय रेल्वे विभागाने या उड्डाणपुलाच्या कामासाठी आपल्या अर्थसंकल्पात १०० टक्के खर्चाची तरतुद केल्याची माहिती डॉ. पवार यांना पत्राद्वारे दिली.
(public issue) निंबळक रेल्वेगेट क्र. ३० हे औद्योगिक क्षेत्र तसेच अहमदनगर शहरानजीक आहे. दररोज हजारो लोक या ठिकाणावरून प्रवास करतात. परंतु , दिवसभरात पंचेचाळीस ते पन्नास रेल्वे येथून ये-जा करत असतात. त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पर्यायाने येथे उड्डाणपुलाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.
(public issue) गेल्या सात वर्षापासून डॉ. पवार हे या रेल्वे उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी रेल्वे महाप्रबंधकांशी पुर्वी झालेल्या चर्चेत निम्मा खर्च हा राज्य शासनाने करावा असे म्हणणे रेल्वे विभागाकडून मांडण्यात आले होते. परंतु ता. १७ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या डॉ. पवार यांच्या निवेदनास उत्तर देताना रेल्वे विभागाकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षात निंबळक रेल्वेगेट क्र ३० येथे उड्डाणपूलाच्या कामासाठी १०० टक्के निधीची अर्थसंकल्पात तरतूद केल्याची माहीती पत्राद्वारे देण्यात आली. त्यामुळे आता निम्मा खर्च राज्य शासनाने करण्याचा प्रश्नही सुटला आहे. अर्थसंकल्पात १०० टक्के निधीची तरतुद झाल्याने उर्वरीत प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामालाही सुरूवात होईल अशी आशा डॉ. पवार यांनी व्यक्त केली.
जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डॉ. पवार यांच्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशामुळे निंबळक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. परंतु , प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन उड्डाणपुलाचे काम कधी पुर्ण होईल ? हे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे हि वाचा : गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी