‘पुस्तक मित्र’ योजनेंतर्गत सानेगुरुजी वाचनालयासाठी पाचहजार पुस्तके जमविण्याचा संकल्प
अहमदनगर | ५ जानेवारी | प्रतिनिधी
(ahilyanagar news) शहरातील केडगाव उपनगरातील रहिवाशी असलेले माणुसकीचे दूत व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते शिवाजी नाईकवाडी यांच्या परिवाराने सलग ११ व्या वर्षी सावित्रीबाईंच्या जन्मदिनी ३ जानेवारीला ‘पुस्तकांची गुढी’ उभारून ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देण्यासाठी संकल्प केला. यावर्षी त्यांनी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ केडगाव परिसरात हा उपक्रम राबविला. उपक्रमास परिसरातील लोकांकडुन मोठा प्रतिसाद मिळाला.
(ahilyanagar news) यावेळी महिला सभेच्या कार्यकर्त्या सुरेखा आडम म्हणाल्या, नाईकवाडी मामा व त्यांचा परिवार नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात. पुस्तकांची गुढी उभारण्याचे त्यांचे हे अकरावे वर्ष आहे. त्यांनी समाजाला एक नवीन आदर्श निर्माण करून दिला.
माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी हे शाळा महाविद्यालयात विविध विषयांवर कार्यशाळा घेतात. त्यांच्या केडगाव येथील राहत्या घरी पुस्तकांची सहा फुटी गुढी उभारली. खरंतर हा नवीनतम उपक्रम सर्वांनी राबवायला हवा. सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्याकडे असलेल्या वाचनालयातील पुस्तकांचा आपण लाभ घ्यायला हवा, असे शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. प्रशांत शिंदे यांनी सांगितले.
“वाचाल तरच जीवनात वाचाल” या प्रमुख उद्देशाने या पुस्तकांच्या गुढीचा संकल्प केलेला आहे, यंदाचे ११ वे वर्ष असून यापुढेही हा उपक्रम सतत सुरूच असेल. एकूण पंधराशेच्यावर पुस्तकांचा समावेश या गुढीसाठी केला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मान्यवर महिलांच्या हस्ते ज्ञानज्योती लावण्यात आल्या, अशी माहिती शिवाजी नाईकवाडी यांनी सांगितली.
आमच्या परिसरात इतका चांगला उपक्रम नाईकवाडी परिवाराने राबविला व त्यामध्ये आम्हा सर्व महिलांना सहभागी करून घेतले. याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे शिक्षिका उमाताई राऊत म्हणाल्या.
यावेळी सावित्री उत्सवानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची कार्य कर्तुत्वाची माहिती शिवाजी नाईकवाडी यांनी सांगून सामुदायिक सावित्रीची ओवी घेण्यात आली तसेच ‘पुस्तक मित्र’ योजनेंतर्गत साने गुरुजी वाचनालयासाठी पाच हजार पुस्तके जमविण्याचा संकल्प करण्यात आला. सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष विवेक पवार व सामाजिक कार्यकर्ते सचिन तुंगार यांनी पुस्तके देण्याचे घोषित केले. उपस्थित महिलांना शिवाजी नाईकवाडी यांच्या पत्नी उषाताई व सुनबाई अश्विनी नाईकवाडी यांनी हळदी कुंकू लावून सावित्रीमाईचा जन्मोत्सव, भारतीयत्वाची एबीसीडी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या बोधकथा ही पुस्तके सस्नेह भेट दिली. सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमास शीलाताई देवढे, सोनाली शिंदे, ज्योती रामदिन, प्राची रणसिंग, अश्विनी म्हस्के, आशा तुंगार, अनिता पवार, वर्षा व विजय देवचके, नेहा व अभिजीत लांडगे, शिवकन्या व पूजा काटे आणि फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनी तसेच परिसरातील बहुसंख्य महिलावर्ग उपस्थित होता.
पुस्तकाची गुढी उभारण्यासाठी नाईकवाडी यांचे नातू शौर्य व आर्य यांनी सहकार्य केले. याप्रसंगी अनेकांनी अशा प्रकारची गुढी उभारण्याचा संकल्प सोडला. हेच या उपक्रमाचे फलित ठरले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा