मुंबई | प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी कार्यालयात सुट्टी टाकून मुंबई विधानभवन येथे जाण्याचा संकल्प केला होता, कारणही तसेच आहे. सध्या सगळीकडे वाजतगाजत सुरुवात झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सगळीकडे कार्यालयीन यंत्रणा सक्रिय झालेली दिसते. महाराष्ट्रातील महिलांसाठी ही घोषणा एक आशादायी स्वप्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री यांची वंचित लाडकी बहिण ॲड. सीमा भाकरे यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, मात्र समाजातील जनसामान्य महिलांना आपली लाडकी बहीण करून त्यांच्या संसाराला हातभार लावणारा महिला व बाल विकास विभाग हा आपल्याच अधिनस्त मागील दहा वर्षापासून ‘मिशन वात्सल्य’ या योजनेअंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेदनांची चाहूल आजपर्यंत विभागांचे मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना लागलेली नाही. कारण ज्या योजनेत अत्यावश्यक सेवा म्हणून दिवस-रात्र या महिला कर्मचारी काम करत आहे तो तसाही सर्वांकडून दुर्लक्षित होणारा विषय आहे, तो म्हणजे बालसंरक्षण.
ॲड. भाकरे यांनी खंत व्यक्त केली की, कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही, आई होण्यासाठी लागणारी प्रसूती रजा कागदावरसुद्धा नाही तर ही रजा अस्तित्वात देण्याचा प्रश्नच येत नाही. कुठलीही साडीचोळी नाही, दिवाळीभेट नाही. कोरोनाकाळात महाराष्ट्रातल्या ३० हजार एक पालक बालकांसाठी, ९ हजार अनाथ बालकांच्या समुपदेशनासाठी आणि ८५० कोविड अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी सातत्यानं काम करत असलेल्या या भगिनी त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. बालविवाह पिडीत मुलींना सांभाळणे, त्यांचे समुपदेशन करणे, दत्तक विधान, लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या बालकांना मार्गदर्शन करणे आदी अनेक कामे बालसंरक्षण यंत्रणेत अर्ध्या मनुष्य बळावर सुरू आहेत. देशातील बालकांची मोफत फोन सेवा 1098 हीच लोक चालवतात. एका दशकापासून राज्य सरकार यांनी कोणतेही धोरण या कर्मचाऱ्यांसाठी केलेलं नाही. मानधन वाढ आणि कामाचा निश्चित आकृतीबंध देखील अस्तित्वात नाही.
अशा बिकट परिस्थितीत समाजातील दुर्लक्षित, सोडून दिलेल्या, अनाथ, एकपालक व अत्याचाराने पिडीत बालकांचा सांभाळ या महिला करत आहेत. या लाडक्या नाहीत का? हा आमचा सवाल आहे ! या लाडक्या देवकीच्या घरात दिव्याखाली अंधार का?
असा परखड सवाल मुख्यमंत्री यांची वंचित लाडकी बहिण, सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या सचिव ॲड. सीमा भाकरे यांनी केला.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.