कर्जत/जामखेड | रिजवान शेख
कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या परंतु राजकीय दृष्टीकोनातून सुमारे ७ हजार सिंचन विहीरींच्या कामांत आणल्या जाणाऱ्या अडथळ्यांविरोधात आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन ही कामे सुरळीत सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. अन्यथा अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर हजारो शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. तसेच चौकशीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या काही महिन्यांत शेतकरी आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन सुमारे ७ हजार सिंचन विहिरींची कामे मंजूर करुन आणली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाच्या माध्यमातून २८० कोटी रुपये जमा होणार आहेत. परंतु राजकीय दृष्टीकोनातून या कामांमध्ये सध्या अडथळे आणले जात असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सिंचन विहिरींची कामे वेळेत पूर्ण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. परंतु केवळ राजकीय हेतूने या कामांमध्ये अडथळे आणले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि विहिरींची कामे कोणत्याही अडथळ्यांविना सुरु ठेवण्याची मागणी केली. अन्यथा अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याशिवाय कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या काही वर्षांपूर्वी अधिकारी आणि कर्मचारी बदलून येण्यास तयार नव्हते. परंतु आमदार रोहित पवार यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासाच्यादृष्टीने मतदारसंघात एक चांगले वातावरण निर्माण केले. त्यामुळे विकासामांनाही गती आली. फळबाग, गायगोठे, शेळी शेड अशी वैयक्तिक लाभाची कामे तसेच जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत, पानंद रस्ते, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, राजीव गांधी सेवा केंद्र, बचत भवन, हॉस्पिटल अशा प्रकारची सार्वजनिक लोकहिताची अनेक कामे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने आ. रोहित पवार यांनी सुरु केली आहेत. तसेच कर्जत तालुक्यात जवळपास ३००० सिंचन विहिरी, १२०० फळबाग, ४००० गायगोठे अशी वैयक्तिक लाभाची तर ५८ जिल्हा परिषद शाळांना संरक्षण भिंत, ३५० पानंद रस्ते, वृक्ष लागवड, राजीव गांधी भवन, पेव्हिंग ब्लॉक, सिमेंट रस्ते, ३५७ गायगोठे व शेळी शेड, १०५० फळबाग, तसेच जामखेड तालुक्यातही जवळपास ४००० सिंचन विहिरी, जिल्हा परिषदेच्या ७६ शाळांना मनरेगाच्या माध्यमातून संरक्षण भिंत, ४ अंगणवाडी इमारती व १ ग्रामपंचायत भवन ही कामे पूर्णत्वास गेली आहेत तर १४ ग्रामपंचायत अंतर्गत राजीव गांधी सेवा केंद्राच्या इमारती मंजूर झाल्या आहेत. परंतु काही अधिकारी व कर्मचा-यांवर चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. वास्तविक चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई केली जात असेल तर मतदारसंघाच्या विकासाला ब्रेक लागतो. त्यामुळे केवळ राजकीय दृष्टीकोनातून कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना केली
केवळ राजकीय हेतूतून शेतकऱ्यांच्या ७ हजार सिंचन विहिरींच्या कामात अडथळे आणले जात असून अधिकाऱ्यांनाही जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. ही बाब मंत्रिमहोदयांना सांगितली आणि विहिरींची ही कामे कोणत्याही अडथळ्याविना सुरु रहावीत तसेच चौकशीच्या नावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये, अशी विनंती केली. विकासकामात मी नेहमी शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. विकासकामांत अडथळा आणल्यास शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन केले जाईल, याची विरोधकांनी नोंद घ्यावी. – रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.