मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील वीज कंपन्यांच्या सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधीकरीता ₹ ५ हजारांची वाढ तर तांत्रिक कर्मचाऱ्यांचा भत्ता ₹५०० वरुन ₹१००० इतका करण्यात आला असल्याचे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेतन पुनर्निर्धारणासंदर्भातील बैठकीत सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या मर्यादित वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
