वांबोरी | प्रतिनिधी
येथील कै. भानुदास सावळेराम व्यवहारे यांच्या स्मरणार्थ वांबोरी साहित्य मित्रमंडळ आयोजित यंदाचा तिसरा वांबोरी कला व प्रबोधन महोत्सव मंगळवारी ता.२३ जुलै रोजी वांबोरीच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्षा अचला झंवर यांनी दिली. कार्यक्रमासाठी आमदार प्राजक्त तनपुरे व २७ हजार झाडांचे पालक निसर्गमित्र संदीप राठोड यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
२३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प्रकाशक मिलिंद काटे यांच्या अनुराधा प्रकाशन आयोजित ग्रंथदालनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व रंगकर्मी विलास कुलकर्णी यांच्या हस्ते होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा व पुस्तके जिंका हा आगळावेगळा कार्यक्रम अर्चना मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल. सायंकाळी ७ वाजता नृत्य, गायन, वादन व नाट्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच किरण ससाणे यांच्या हस्ते होईल.
कार्यक्रमात वांबोरी व पंचक्रोशीतील अनेक मुले व मुली आपली कला सादर करणार आहेत. यावेळी शासकीय परीक्षेत घवघवीत यश मिळवण्याऱ्या गणेश दांगट व आश्विनी तागड या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. त्यानंतर तालुक्याचे आमदार प्राजक्त तनपुरे व निसर्गमित्र आणि २७ हजार झाडांचे पालक संदीप राठोड यांच्या बहारदार मुलाखतीचा कार्यक्रम रंगणार आहे. या मुलाखतीनंतर प्रकाश बाफना, डॉ.विशाल तिकडे, माणिकताई पागिरे, भाऊसाहेब साठे, प्रमोद चोथे, मंगलताई परदेशी व सादिक कोतवाल आदींचा वांबोरी विशेष सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे तसेच येथील युवालेखक, सध्या मुंबईस नोकरीस असणारे आशिष निनगुरकर यांच्या ‘सिनेमा डॉट कॉम’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी होणार आहे.
वांबोरी वृक्षमित्र विद्यार्थ्यांचा पदक प्रमाणपत्र सोहळा पार पडणार आहे तसेच गावातील विविध कलावंतांचा विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाचा समारोप होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी दिली. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ.ए.सोसायटीची प्राथमिक शाळा, महेश मुनोत विद्यालय, भागीरथी बाई कन्या विद्यालय, उन्नती कोचिंग क्लासेस, हजारेज् न्यूटन क्लासेस, जान्हवी क्लासेस व देवांकुर क्लासेस आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वांबोरी साहित्य मित्र मंडळाचे गणेश जगताप, नासिर कोतवाल, निवृत्ती पाटील, स्वरूप कासार, रोहिदास ससाणे, संतोष महापुडे, अमोल ससाणे, बाळासाहेब कांबळे, डॉ.योगेश पानसरे, निशा तोडमल, अप्पासाहेब पागिरे, बाळासाहेब साखरे, अनिकेत पाठक, अर्चना मकासरे व अशोक व्यवहारे आदी प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या वांबोरी महोत्सवाला रसिकांनी उपस्थित राहून दाद द्यावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुस्तक प्रकाशन : वांबोरी (ता.राहुरी) येथील रहिवासी असणारे युवालेखक आशिष निनगुरकर हे मुंबईत डाक विभागात नोकरीस असून ते साहित्य-कला क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत. त्यांनी सिनेमाविषयक लिहिलेल्या तेजश्री प्रकाशनाची निर्मिती असलेल्या ‘सिनेमा डॉट कॉम’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.