मुंबई (प्रतिनिधी) २०.६.२०२४
महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आर्थिक लाभ मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे शालेय गणवेशाचे शिलाईकाम महिला आर्थिक विकास महामंडळच्या (माविम) बचत गटांकडून करून घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार आज कोल्हापूर व सांगली येथील माविमच्या बचत गटांकडून शिवणकाम केलेल्या शालेय गणवेशाचे वाटप दुरदृश्यप्रणालीद्वारे आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच आज मंत्रालयात प्रातिनिधीक स्वरूपात काही शाळांमधील मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता १ ली ते ८ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.
यावर्षी एक राज्य एक गणवेश योजनेनुसार राज्यभरात एकाच कलरचे गणवेश वाटप करण्यात येत आहेत. त्यामुळे एकसमानता पाहायला मिळते, याचे समाधान आहे. तसेच यापुढे गणवेश शिवणकाम करताना शालेय शिक्षण विभागाचे आणि माविमच्या तेजस्विनी या नावाचे स्टिकर लावता येतील का याचाही विचार करावा अशी सूचना तटकरे यांनी केली. बचत गटांच्या महिलांना रोजगार निर्मितीची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे (ऑनलाइन) सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही बचतगट आणि शाळेतील विद्यार्थी शिक्षक (ऑनलाइन) उपस्थित होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.