World news | 500 वर्षांनंतर ऐतिहासिक घटना; राजे चार्ल्स तिसरे आणि पोप लिओ चौदावे प्रथमच संयुक्त प्रार्थनेत

उपसंपादक | दिपक शिरसाठ

व्हॅटिकन सिटी | २४.१० | रयत समाचार

(World news) इतिहासात प्रथमच दोन राष्ट्रप्रमुख आणि सर्वोच्च धर्माचार्य एकत्र उपासनाविधीत सहभागी झाले. बुधवारी ता. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हॅटिकन सिटीत ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी पोप लिओ चौदावे यांच्यासोबत सार्वजनिकरीत्या प्रार्थना करून इतिहास रचला.

(World news) इंग्लंडच्या घटनाप्रणालीप्रमाणे ब्रिटनचा राजा अथवा राणी हे चर्च ऑफ इंग्लंड म्हणजेच अँग्लिकन चर्चचे पदसिद्ध प्रमुख असतात. तेच कँटरबुरीच्या आर्चबिशपची नेमणूक करतात. तर कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च धर्माचार्य पोप हे जगातील सर्वात छोटे राष्ट्र व्हॅटिकन सिटी यांचे राष्ट्रप्रमुखदेखील आहेत.

(World news) राजा चार्ल्स आणि राणी कामिला यांनी प्रसिद्ध सिस्टाईन चॅपलमध्ये झालेल्या या धार्मिक सेवेत सहभाग घेतला. मायकेल अँजेलो यांच्या ‘लास्ट जजमेंट’ या भव्य कलाकृतीखाली हा विधी पार पडला. हीच ती सिस्टाईन चॅपल जिथे गेल्या अनेक शतकांपासून कार्डिनल्स बंद दरवाजांआड नवे पोप निवडतात. या स्थळाचे आध्यात्मिक वैभव अनुभवताना जगातील सर्व धर्मगुरूंना एक विलक्षण शांततेचा स्पर्श जाणवतो.

राजा चार्ल्स यांच्या या भेटीला इतिहासातील पाचशे वर्षांचा दुरावा मिटवणारे पाऊल मानले जात आहे. १५३४ मध्ये इंग्लंडचा राजा हेन्री आठवा याने पोप क्लेमेंट सातवे यांनी घटस्फोटास नकार दिल्याने स्वतःचे स्वतंत्र चर्च चर्च ऑफ इंग्लंड स्थापन केले. त्यानंतर कॅथोलिक आणि अँग्लिकन चर्चमध्ये फूट पडली होती.

त्या विभाजनानंतर प्रथमच एका ब्रिटिश राजाने पोपसमवेत सार्वजनिक प्रार्थना केली आहे. या घटनेला ‘धार्मिक समेटाचे प्रतीकात्मक ऐतिहासिक पाऊल’ म्हणून जगभरातून गौरवले जात आहे. या सेवेत कॅथोलिक चर्चची पारंपरिक लॅटिन स्तोत्रे आणि अँग्लिकन चर्चची इंग्रजी प्रार्थना एकत्र झाली. येशू ख्रिस्ताच्या ‘लॉर्ड्स प्रेअर’ ने विधीची सुरुवात झाली. गायनात सिस्टाईन चॅपल आणि विंडसर कॅसलच्या गायकवृंदांचा सहभाग होता. राजेशाही शिष्टाचारानुसार राणी कामिला यांनी काळा पोशाख व लेस परिधान केली होती.

राजा चार्ल्स यांनी यापूर्वी तीन पोपना भेट दिली होती जॉन पॉल दुसरे, बेनेडिक्ट सोळावे आणि फ्रान्सिस पण कधीही संयुक्त प्रार्थना झाली नव्हती. तथापि, या एकत्रित प्रार्थनेवर काही कर्मठ गटांकडून टीकाही झाली. एका प्रोटेस्टंट धर्मगुरूने म्हटले, ‘राजा चार्ल्स यांनी पोपसमवेत प्रार्थना केली असल्याने त्यांनी आपल्या प्रोटेस्टंट धर्माच्या शपथेचे उल्लंघन केले असून सिंहासनाचा त्याग करावा.’

ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी सांगितले, ही घटना फक्त धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक व तात्त्विक दुरावा मिटवणारा क्षण आहे. पाचशे वर्षांनंतर व्हॅटिकनमध्ये घडलेले हे दृश्य मानवतेच्या एकात्मतेचा नवा अध्याय लिहून गेले आहे.

 

Share This Article