कोल्हापूर | १३.१२ | रयत समाचार
(World news) अमेरिकन जन्माच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि दलित हक्कांच्या अग्रणी कार्यकर्त्या प्रा. गेल ओम्वेट (१९४१–२०२१) आणि त्यांचे जीवनसाथी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘Gail & Bharat’ हा जागतिक स्तरावर प्रशंसित माहितीपट रविवारी ता. १४ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे विशेष सार्वजनिक प्रदर्शनासाठी सादर केला जाणार आहे.
(World news) दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांच्या या ८० मिनिटांच्या माहितीपटाची भाषा मराठी आणि इंग्लिश असून, अवघड शैक्षणिक संकल्पनांऐवजी गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या वैयक्तिक आयुष्याचा, संघर्षाचा आणि चळवळीतील सहभागाचा हृद्य वेध यात घेतला आहे. त्यांच्या आयुष्याच्या माध्यमातून भारतातील अस्पृश्यताविरोधी, शोषणविरोधी आणि सामाजिक न्यायाच्या व्यापक लढ्यांची पार्श्वभूमीही प्रभावीपणे उलगडते.
(World news) भारतातील सामाजिक चळवळींचे सखोल दस्तऐवजीकरण तुलनेने कमी असताना ‘Gail & Bharat’ हा माहितीपट या ऐतिहासिक संघर्षांचे जतन करणारा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. दशकानुदशके चाललेल्या त्यांच्या कार्याचा हा चित्रपट संवेदनशील, विचारप्रवर्तक आणि कलात्मक मांडणीसह मागोवा घेतो.
ऑक्टोबर महिन्यात या माहितीपटाचे युनायटेड किंगडम आणि युरोपमधील अनेक नामवंत शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रांमध्ये यशस्वी प्रदर्शन झाले आहे. त्यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लीड्स युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स, लायस्टर सेक्युलर सोसायटी (LSS), पब्लिकन हाऊस लंडन आणि SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन यांचा समावेश आहे. याशिवाय जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ हायडेलबर्ग, सबकॉन्टिनेंट बर्लिन तसेच नेदरलँड्समधील लाईडन युनिव्हर्सिटी येथेही हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या कला महोत्सवांपैकी एक असलेल्या कोची बिएनालेमध्येही ‘Gail & Bharat’ हा माहितीपट १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
कोल्हापूरमधील हे विशेष प्रदर्शन राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० ते ७.३० वेळेत होणार असून, सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनाच्या चळवळींशी जोडलेल्या सर्व विचारवंत, कार्यकर्ते आणि रसिकांनी या दुर्मीळ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
