World news | इटलीत ‘Forever Chemicals’ वर मात करणाऱ्या आईंचा भारतात इशारा; कोकणात PFAS विरोधात ऐतिहासिक इंडो इटालियन लढ्याची घोषणा

मुंबई | १९.१ | रयत समाचार

(World news) इटलीत पिण्याच्या पाण्यातून ‘Forever Chemicals’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PFAS या अतिविषारी रसायनांचा पर्दाफाश करून एका बहुराष्ट्रीय कंपनीला बंद पाडणाऱ्या Mamme No PFAS (Mothers Against PFAS) या आईंच्या संघटनेने आता भारतातील कोकणाकडे मोर्चा वळवला आहे.

(World news) २०१३ पासून इटलीतील पाण्यात PFAS मिसळणाऱ्या Miteni कंपनीविरोधात या आईंनी उभारलेला संघर्ष अखेर ऐतिहासिक ठरला. या प्रकरणात कंपनीवर बंदी घालण्यात आली, तर जबाबदार ११ व्यवस्थापकांना एकत्रितपणे १४१ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.

(World news) या लढ्याची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा एका आईला आपल्या मुलीच्या रक्तात PFAS चे प्रमाण ८ ng/ml च्या सुरक्षित मर्यादेपेक्षा थेट ३८९ ng/ml असल्याचे आढळून आले. त्यानंतर इटलीतील काही आईंनी सुरू केलेला आवाज पुढे ११ हजार मातांचा जनआंदोलन बनला.
आता धोका भारतात, कोकणात !
गंभीर बाब म्हणजे, इटलीतून हाकलून दिलेल्या Miteni कंपनीशी संबंधित व्यक्ती आज भारतातील लोटे परशूराम औद्योगिक वसाहतीत सुरू झालेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक / Viva Lifesciences या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या आहेत.
माहितीनुसार, Miteni कंपनीचा माजी CEO Nardone हा २०२१ मध्ये या भारतीय कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी झाला आहे. या प्रकल्पातून पुन्हा तेच PFAS रसायन पाणी, जमीन व अन्नसाखळीत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
PFAS ही रसायने निसर्गात नष्ट होत नाहीत, मानवी शरीरातून बाहेर टाकता येत नाहीत आणि पाणी, अन्न, प्राण्यांमार्फत थेट माणसाच्या शरीरात साठतात. त्यामुळे कर्करोग, हार्मोनल बिघाड, गर्भधारणेतील अडचणी यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
जगात कुठेही ही कंपनी उभी राहू देणार नाही – इटालियन आई
काल पार पडलेल्या दोन तासांच्या ऑनलाइन चर्चेत मिकेला, क्लाउडीया, डानिएला, जियोव्हाना या इटालियन आईंनी स्पष्ट शब्दांत सांगितले, जगातली प्रत्येक मुलं ही आमचीच आहेत. गरज पडली तर आम्ही भारतात येऊनही आंदोलन करू.

या संवादातून आता The Next Indians : जल, जंगल, जमीन आणि Mamme No PFAS यांचा संयुक्त इंडो–इटालियन लढा अधिकृतपणे सुरू झाला आहे.

माध्यमांचे मौन, लोकांचा सवाल
इतक्या गंभीर पर्यावरणीय व आरोग्यविषयक मुद्द्यावर काही मोजकी डिजिटल माध्यमे वगळता मुख्य प्रवाहातील माध्यमांचे मौन प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
या संपूर्ण लढ्याच्या पुढील सर्व बैठका, चर्चा व रेकॉर्डिंग सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार असून, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन वरुण सुखराज यांनी केले आहे. हा लढा केवळ कोकणासाठी नाही, तर भारताच्या जल, जंगल, जमीन आणि पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे.
Share This Article