नवी दिल्ली | रयत समाचार
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) लवकरच भारताच्या परकीय चलन विनिमय व्यवस्थेचे पुनर्वर्गीकरण करून तिला ‘क्रॉलिंग पेग’ या श्रेणीत ठेवणार असल्याची गंभीर माहिती ब्लूमबर्ग आणि रॉयटर्सने दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेने यास नोंदवलेला तीव्र विरोधही आयएमएफने दुर्लक्षित केल्याची चर्चा असून त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नवे धोक्याचे संकेत निर्माण झाले.
क्रॉलिंग पेग म्हणजे काय?
ज्या चलनाची किंमत सातत्याने घसरत राहते आणि ज्याची विनिमयदराची पायरी पायरीने घसरण आयएमएफकडून निश्चित केली जाते, त्या चलनांना क्रॉलिंग पेग करन्सी म्हणतात. या श्रेणीत सध्या फक्त अर्जेंटिनाचा पेसो आणि बांगलादेशाचा टका यांचा समावेश आहे. आता भारताचा रुपया या यादीत सामील होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे.
रुपयाची ऐतिहासिक घसरण; गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता : डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरत चाललेली किंमत, परकीय चलन भांडारावरील ताण आणि आर्थिक निर्देशकांतील कमकुवतपणा यामुळे आयएमएफ ही कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयाचा परिणाम काय होऊ शकतो हे पहिले तर भांडवल बाहेर जाण्याची भीती वाढेल. विदेशी गुंतवणूक कमी होऊ शकते. निर्यातदारांना कमी दर मिळतील. आयात महाग होणार असल्याने उद्योगांवर मोठा परिणाम तर रुपयावर सातत्याने दबाव निर्माण होऊ शकतो.
२०२३ पर्यंत फ्लोटिंग, मग स्थिर आणि आता पुन्हा संकटात : नोटबंदी, वारंवार बदलणारे जीएसटी नियम आणि राजकीय प्राधान्यांमध्ये आर्थिक धोरणे दुय्यम ठेवल्याचा आरोप करत अनेक तज्ज्ञांनी पूर्वीच इशारे दिले होते. २०२३ पर्यंत भारताची मुद्रा फ्लोटिंग श्रेणीत होती; त्यानंतर काही काळ ती स्थिर श्रेणीत गेली. परंतु आता पुन्हा एकदा आयएमएफच्या ‘नजरे’त येत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा : जर आयएमएफने प्रत्यक्षात भारताला क्रॉलिंग पेग श्रेणीत टाकले, तर रुपयाची घसरण दीर्घकाळ थांबणार नाही. महागाईचा दबाव वाढू शकतो. व्यापार तुटीचा फुगा अधिक फुगेल आणि आर्थिक धोरणकर्त्यांवर तातडीच्या सुधारणा करण्याचा दबाव वाढेल.
सरकार आणि आरबीआयसमोर मोठे आव्हान : अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी सशक्त सुधारणा, गुंतवणुकीला पोषक वातावरण आणि दीर्घकालीन चलन स्थैर्याच्या नीति तयार करणे अत्यावश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा उपाययोजना वेळेत राबवल्या असत्या तर रुपयाची इतकी दुर्दशा झाली नसती.
भारतीय रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर आयएमएफचा हा ‘क्रॉलिंग पेग’ इशारा म्हणजे राष्ट्राच्या आर्थिक आरोग्यासाठी गंभीर संकेत मानला जात आहे.
