नवी दिल्ली | २० जून | प्रतिनिधी
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. दोन्ही देशांनी सातत्याने एकमेकांवर हल्ले चढवले असून, या युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक राजकारणात दोन स्पष्ट गट पडले आहेत. एकीकडे अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी आहे, तर दुसरीकडे रशिया आणि चीनसारखे शक्तिशाली देश इराणला पाठिंबा देत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका महत्वाची ठरत आहे. भारताने पारंपरिक तटस्थ भूमिका घेत शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र आता इराणने थेट भारताकडे इस्रायलविरोधात भूमिका घेण्याची मागणी केली आहे.
भारतामधील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद हुसैनी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भारतासारख्या मोठ्या आणि शांतताप्रिय राष्ट्रांनी या संघर्षात स्पष्ट भूमिका घेत इस्रायलच्या कारवायांचा निषेध केला पाहिजे. नेतन्याहू सरकारवर दबाव टाकण्यात भारताने आघाडी घेणे आवश्यक आहे. भारताकडून आम्हाला भविष्यात अधिक सहकार्याची अपेक्षा आहे.
भारत आणि इराण यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध असून, चाबहार बंदरासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये दोन्ही देश सहकार्य करत आहेत. अशा वेळी इराणकडून भारतावर दबाव टाकण्याची ही मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे.
भारत सरकारने अद्याप या मागणीवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र भारताची परराष्ट्र धोरणांमध्ये ‘रणनीतिक तटस्थता’ हे धोरण महत्त्वाचे मानले जाते. अशा संघर्षपूर्ण परिस्थितीत भारत कशा प्रकारे आपली भूमिका ठरवतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.