World cup | भारतीय महिलांनी घडवला इतिहास; नवी मुंबईत विश्वचषकावर कोरले भारताचे नाव

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | ०३.११ | गुरुदत्त वाकदेकर

(World cup) डॉ. डी.वाय. पाटील क्रीडा संकुलात पार पडलेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या रोमांचक अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत इतिहास रचला. भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांवर गुंडाळला गेला.

 

(World cup) भारताकडून शफाली वर्माने अविस्मरणीय ८७ धावांची खेळी साकारत सामन्याचा पाया भक्कम घातला. तिच्या साथीला स्मृती मंधाना हिने ४५ धावा, तर दीप्ती शर्माने प्रभावी ५८ धावा करून डावाला भक्कम आधार दिला. रिचा घोषने शेवटी फटकेबाजी करत २४ चेंडूत ३४ धावा झळकावल्या. आयाबोंगा खाका हिने दक्षिण आफ्रिकेसाठी ९ षटकांत ५८ धावांत ३ बळी घेतले.

 

(World cup) दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने लढाऊ १०१ धावांची शतकी खेळी साकारली, पण इतर फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. दीप्ती शर्माने अचूक गोलंदाजी करत ९.३ षटकांत ३९ धावांत ५ गडी बाद केले. शफाली वर्मानेही गोलंदाजीत हात आजमावत दोन बळी मिळवले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अखेरची धावसंख्या २४६ इतकी राहिली आणि भारताने ५२ धावांनी शानदार विजय मिळवला.

 

या विजयासह भारताने महिला विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. शफाली वर्माला सामनावीर घोषित करण्यात आले, तर दीप्ती शर्माला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान मिळाला. भारतीय संघाच्या या विजयाने संपूर्ण देशभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, नवी मुंबईतील क्रीडांगणात “भारत माता की जय” चा घोष घुमला.

 

या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले. शफाली वर्मा हिने एका विश्वचषकात सर्वाधिक चौकार (४७) मारण्याचा नवा विक्रम केला, तर दीप्ती शर्मा ही अंतिम सामन्यात पाच बळी घेणारी भारताची पहिली महिला गोलंदाज ठरली. भारतीय संघाने २९८ धावांचा एकूण धावसंख्या नोंदवत महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील आपला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. तसेच ऋचा घोष हिने सर्वाधिक झेल (४) घेऊन विक्रम प्रस्थापित केला.

 

भारतीय महिला संघाचा हा विजय केवळ क्रीडाजगताचाच नव्हे, तर नव्या भारतातील महिला सक्षमीकरणाचं दैदिप्यमान प्रतीक ठरलंआहे. विश्वचषकावर भारताचा विजयाचा शिक्का उमटवत स्मृती, शफाली, दीप्ती आणि संपूर्ण संघाने भारतीय क्रीडाऐतिहासिक सुवर्ण पान लिहिले आहे.

 

Share This Article