(Women) सक्षम फाउंडेशन आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “चला ‘ती’ ला समजून घेऊया, कौटुंबिक हिंसामुक्त घर : महिलांचा हक्क व आरोग्य” या विषयावर आधारित महिला स्नेह मेळावा सिद्धार्थनगर, श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडला. महिलांना जागरूक करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात ‘कौटुंबिक हिंसामुक्त घर, महिलांचा हक्क’ या माहितीपुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
(Women) मेळाव्यात महिलांच्या आरोग्यविषयक जागृतीसह मासिक पाळी व्यवस्थापन व त्यावरील सामाजिक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रबोधन करताना कमलेश म्हंकाळे यांनी सांगितले, मासिक पाळी हा शाप नसून महिलांना मिळालेलं वरदान आहे. महिलांनी स्वतःला कमी लेखू नये व सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
(Women) जिल्हा संरक्षण अधिकारी विकास बागुल यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे विविध प्रकार, त्यावरील उपाययोजना आणि शासनाच्या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांचे हक्क, अधिकार, आणि शिक्षणाचे महत्त्व विशद करत कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे होत्या. आपल्या भाषणात त्यांनी महिलांनी कौशल्य शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले. “महिलांना शिक्षण व स्वावलंबन मिळाल्यासच हिंसामुक्त घराचे स्वप्न साकार होईल,” असे त्या म्हणाल्या. भविष्यात अशा कार्यक्रमांची शहर व तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणात आखणी करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास राजश्रीताई ससाणे, दिशा पिंकी शेख, कमलेश म्हंकाळे, सिस्टर जॅकलिन (संत लुक हॉस्पिटल), सोनम धीवर (विभाग समन्वयक), विकास बागुल (संरक्षण अधिकारी), संगीता मांडलिक (मा. नगरसेविका), दिपाली फरगडे (सरपंच, भैरवनाथनगर), बाबासाहेब वाणी, मिलिंदकुमार साळवे, सोनूकुमार मिसाळ, जामकर (गोंड समाज अध्यक्ष), अशोक दिवे सर (शंभूक वसतिगृह), बाबा मिसाळ, अमोल (सिद्धार्थनगर युथ फाउंडेशन), सुशील पठारे (अध्यक्ष, सक्षम फाउंडेशन), मयूर गायकवाड आणि रेखा वाघमारे यांची उपस्थिती लाभली.
शहर व तालुक्यातील १५० हून अधिक महिला, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सिद्धार्थनगर युथ फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सुशील पठारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोलकुमार यांनी केले.