Women | एसटी स्टँडवरील महिलांची कुचंबणा थांबवा; स्वच्छगृहे मोफत करण्यासाठी कृष्णा चांदगुडेंची डॉ. गोऱ्हे यांच्याकडे मागणी

SubEditor | Dipak Shirasath

नाशिक | ३.३ | रयत समाचार

(Women) राज्यातील एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांसाठी महिलांकडून आकारले जाणारे शुल्क तात्काळ बंद करून सर्व स्वच्छगृहे मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली.

(Women) चांदगुडे यांनी केलेल्या मागणीत म्हटले की, राज्यातील विविध बस स्थानकांवर महिलांना स्वच्छतागृह वापरण्यासाठी पाच रुपये आकारले जातात. अनेकवेळा ग्रामीण भागातील महिलांकडे सुट्टे पैसे नसतात. काही ठिकाणी डिजिटल स्कॅनरची सुविधा असली तरी खेड्यातील महिलांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे त्या सुविधेचा उपयोग करता येत नाही. परिणामी महिलांची गैरसोय व कुचंबणा होते.

(Women) पुरुषांना मोकळ्या जागेत शौचास जाण्याचा पर्याय असतो; मात्र महिलांसाठी अशी कोणतीही सोय नसते. विशेषतः मासिक पाळीच्या काळात स्वच्छतागृहाची गरज अधिक भासते. अशा परिस्थितीत महिलांकडून शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे चांदगुडे यांनी म्हटले आहे.

बस प्रवासात महिलांना शासनाकडून सवलत दिली जाते; परंतु बस स्थानकावरील स्वच्छतागृहासाठी शुल्क आकारले जाणे हे विसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपाहारगृहे, मॉल, दवाखाने आदी ठिकाणी मोफत स्वच्छतागृहे उपलब्ध असतात. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवरील कंत्राटी पद्धतीने चालणारी स्वच्छतागृहे मोफत करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
डॉ. नीलम गोऱ्हे या महिलांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणाऱ्या नेत्या असून त्या याबाबत परिवहन मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक कार्यवाही करतील, अशी अपेक्षा चांदगुडे यांनी व्यक्त केली. अधिक माहितीसाठी कृष्णा चांदगुडे यांना 9822630378 यांना संपर्क साधावा.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

Share This Article