अहमदनगर | १३.१० | रयत समाचार
महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि सी.एस.आर.डी. समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ता.१२ ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हा महिला परिषदेत स्त्रीमुक्तीचा पुनर्जागर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या घोषणेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित परिषदेत गेल्या अर्धशतकातील स्त्रीचळवळीचा आढावा घेण्यात आला.
प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. मनिषा गुप्ते यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले, गेल्या पन्नास वर्षांच्या स्त्रीचळवळीमुळे स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. हा वारसा आपण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. स्त्रीपुरुष समतेच्या मूल्यांवर आधारित आणि संविधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हेच आपल्या चळवळीचे ध्येय असावे.
परिषदेचे उद्घाटन सी.एस.आर.डी. संस्थचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांनी केले. यावेळी ते म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे नेत स्त्रीचळवळीने समाज परिवर्तनाचा दीप प्रज्वलित ठेवला आहे.
पोलिस विभागाच्या भरोसा सेलच्या प्रमुख प्रियंका आठरे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तर परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, सर्व धर्मीय समाजात ऐक्य आणि भगिनीभाव वाढवणे, धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर उभे राहून चळवळीला सामर्थ्य देणे हेच खरे स्त्रीमुक्तीचे कार्य आहे.
परिषदेच्या प्रास्ताविकात नीलिमा जाधव बंडेलूयांनी जिल्ह्यातील स्त्रीचळवळींचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या कॉ. लता भिसे-सोनवणे यांनी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या वाटचालीचा आणि विविध मोहिमांचा उल्लेख करताना म्हणाल्या, एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन स्त्रियांना समानतेच्या लढ्यात पुढे जायचे आहे.
डॉ. रमेश अवस्थी आणि कॉ. स्मिता पानसरे यांनी हिंसेच्या विविध पैलूंवर चर्चेचे सत्र घेतले. सहभागी प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या हिंसेविरुद्ध एकत्रित लढ्याची गरज अधोरेखित केली. ॲड. निर्मला चौधरी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बेपत्ता मुलींच्या गंभीर प्रश्नाची मांडणी केली.
कार्यक्रमात शाहीर प्रवीण सोनवणे, संदिप सकट आणि कुटुंबिय आणि साथीदारांनी चळवळीवर आधारित प्रेरणादायी गीते सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संध्या मेढे यांनी केले.
परिषदेच्या आयोजनात संध्या मेढे, ॲड. निर्मला चौधरी, विजया जाधव, सॅम्युअल वाघमारे, भैरवनाथ वाकळे, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे, सुरेखा आडम, शांताराम जाधव, मंगला भावसार, सरोज आल्हाट, स्मिता पानसरे, तुषार सोनवणे, पंकज गुंदेचा आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परिषदेला जिल्हाभरातून आलेल्या स्त्रीपुरुष प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अहिल्यानगरात स्त्रीमुक्तीचा आवाज नव्या जोमाने घुमला.