मुंबई |०१.१०|गुरुदत्त वाकदेकर
(Sports) भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक २०२५ ला विजयी सुरुवात करत श्रीलंकेवर डकवर्थ-लुईस पद्धतीने ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात अष्टपैलू दीप्ती शर्मा हिच्या फलंदाजीतल्या भक्कम खेळीने आणि गोलंदाजीतल्या भेदक माऱ्याने मोलाची भूमिका बजावली.
(Sports) भारताने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकांत ८ बाद २६९ धावा केल्या. स्मृती मानधना अवघ्या ८ धावांवर बाद झाल्याने सुरुवातीला धक्का बसला होता; मात्र दीप्ती शर्मा (५३) व अमनजोत कौर (५७) यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. याशिवाय हर्लिन देओलने ४८, तर स्नेह राणा २८ धावा करून नाबाद राहिली. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने चार, तर उदेशिका प्रबोधनीने दोन विकेट्स घेतल्या.
(Sports) पावसामुळे दोनदा व्यत्यय आलेल्या या सामन्यात डीएलएस पद्धतीनुसार श्रीलंकेला २७१ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी संघ ४५.४ षटकांत २११ धावांवर गुंडाळला गेला. दीप्ती शर्माने ३ बळी घेतले, तर स्नेह राणा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
