पाथर्डी | नितीन गटाणी
Spirituality: श्री मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त दहा विश्वस्तांची प्रथम परिचय बैठक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. देवस्थानचे आगामी कामकाज, भाविकांना सोयी–सुविधांची उपलब्धता आणि मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास या विषयांवर न्यायाधीश शेंडे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
बैठकीत भाविक, मोहटे ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी रुग्णालय उभारणी, बाह्यरुग्ण (OPD) सेवा तातडीने सुरू करणे, देवस्थानाची विविध माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी वाढवणे, भाविकांशी माहितीपूर्ण संपर्क वाढवणे यावर चर्चा झाली.
भाविकांच्या मागणीनुसार उत्सवमूर्तीवरील अभिषेक सेवा पुन्हा सुरू करणे, विविध धार्मिक पूजांची व्यवस्था उपलब्ध करणे, मोहटे ग्रामस्थांच्या सहभागाने वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यासाठी योजना तयार करणे यावर भर देण्यात आला.
देवीच्या सुलभ दर्शनासाठी आधुनिक, शिस्तबद्ध दर्शनव्यवस्था उभारणे, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या सहाय्याने मंदिर परिसराचा विकास करून भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. देवस्थानच्या उन्नतीसाठी संकल्पित कार्ययोजना तयार करून अंमलबजावणीस प्रारंभ करण्यावर सर्व विश्वस्त एकमत झाले.
नवनियुक्त विश्वस्तांनी पदसिद्ध विश्वस्त तसेच न्यासाचे चेअरमन व जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या नेतृत्वाखाली देवस्थानाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. भाविकांच्या सहकार्याने मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला योग्य प्रतिष्ठा मिळवून देण्याची बांधिलकी व्यक्त करण्यात आली.
बैठकीस बाबासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. कल्याण बडे, ॲड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, ऋतिका कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन ॲड. विक्रम वाडेकर यांनी केले. प्रास्ताविक शुभम दहिफळे, तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले.
हे हि वाचा: Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
