छत्रपती संभाजीनगर | ४.५ | रयत समाचार
(Social) पी.ई.एस अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील १०० कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिकृत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. ‘सेव्ह पीईएस‘ संघटनेने काही दिवसांपूर्वी शासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला असून, अनेक पीडित कर्मचाऱ्यांनीही प्रशासनाकडे धाव घेत आपापल्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
(Social) या प्रकरणात प्रभारी प्राचार्य प्रा. संदीप कीर्तने यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे आर्थिक गुन्हे शाखेकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, चौकशीची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड यांच्याकडे सोपविण्यात आली.
(Social) तक्रारदार प्रा. कीर्तने यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांच्यासह तत्कालीन सहसंचालक महेश शिवणकर, उमेश नागदिवे आणि विद्यमान सहसंचालक डॉ. किरण लाढाणे यांच्यावर संगनमताने तब्बल १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप नोंदवला आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ? : ता. ४ एप्रिल २०१३ रोजी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पी.ई.एस अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाचे अधिकार महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालकांकडे देण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन सहसंचालक महेश शिवणकर यांना अधिकृत करून वेतन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०१७ पासून प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी संचालकांच्या आणि न्यायालयाच्या आदेशाला बगल देत अज्ञात खात्यांद्वारे वेतन वितरण सुरू केल्याचा आरोप आहे. या अनियमिततेचा खुलासा २०२३ मध्ये देवरे समितीच्या अहवालातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राध्यापकांवर अन्याय, जबरदस्ती राजीनामे : दरम्यान, अनेक पात्र व अनुभवी प्राध्यापकांच्या वेतनातून बेकायदेशीर कपात करण्यात आल्याने अनेकांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. हे सर्व कर्मचारी तत्कालीन अधिकृत चेअरमन के.एच. रंगनाथ यांच्या आदेशानुसार उच्च श्रेणीत कार्यरत होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वेतन थांबल्याने उघड झाला प्रकार : प्रा. संदीप कीर्तने यांची पॉलीटेक्निकच्या प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना पीईएसच्या खात्यातून वेतन दिले जात होते. मात्र काही काळानंतर त्यांचे वेतन थांबविण्यात आले. व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सखोल चौकशी केली असता, वेतन प्रक्रिया सहसंचालकांऐवजी प्राचार्यांकडून होत असल्याचे उघड झाले.
आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रा. कीर्तने यांचा लेखी जबाब नोंदवला आहे.
घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यता : या प्रकरणाला आता सार्वजनिक पातळीवर वाचा फुटल्याने आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घोटाळ्याचा आकडा १०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी समाजाच्या विविध स्तरांतून जोर धरू लागली आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
