अहमदनगर | २२.५ | रयत समाचार
(Social) शहरातील अप्पू हत्ती चौक येथे उभारण्यात येत असलेल्या घोड्याच्या पुतळ्यावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
(Social) निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर शहराच्या ऐतिहासिक आणि सामाजिक वारशात भर घालण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. लालटाकी ते दिल्लीगेट मार्गावरील महत्त्वाच्या चौकास लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्यात आले असून, त्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने करण्यात येत आहे.
(Social) सकल मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, संबंधित चौकाच्या सुशोभीकरणासाठी एका खासगी संस्थेला अत्यंत घाईगडबडीत आणि संगनमताने परवानग्या देण्यात आल्या. एका दिवसात नगररचना विभाग, वाहतूक शाखा आणि अन्य विभागांकडून मंजुरी मिळाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या चौकाचे सुशोभीकरण करताना ऐतिहासिक अप्पू हत्तीचा पुतळा हटविण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचेही नमूद करण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, लालटाकी परिसर आणि त्या लगतच्या दलित वस्त्यांमध्ये दलित सुधार योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात दलित समाजाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा उभारणे आवश्यक आहे.
लहुजी वस्ताद साळवे यांचे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या कार्याशी असलेले ऐतिहासिक नाते अधोरेखित करत, अहमदनगर शहराशी त्यांचे सामाजिक संबंध अतिशय जवळचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने नगर शहरात त्यांचा सन्मान होणे ही काळाची गरज असल्याचे मत सकल मातंग समाजाने व्यक्त केले.
दरम्यान, प्रशासनाने संबंधित ठेकेदार संस्थेचा ठेका रद्द करून घोड्याचा पुतळा कायम ठेवत त्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा उभारण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी झालेला खर्च सकल मातंग समाजाकडून देण्याची तयारीही निवेदनाद्वारे दर्शविण्यात आली. भविष्यात पुतळ्याची देखभाल, संरक्षण आणि चौकाचे सुशोभीकरण करण्याची जबाबदारीही समाजाच्या वतीने स्वीकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रशासनाने या मागणीवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय न घेतल्यास सकल मातंग समाजाच्या वतीने तीव्र लोकजागृती आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी भगवान जगताप, संदीप सकट, शाम वैराळ, राहुल शेकटकर, लक्ष्मण भाऊ शिंदे, जालिंदर शेलार, मनोजभाऊ साठे आदी उपस्थित होते.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

