Religion | कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात श्री क्षेत्र राममाळ उजळले

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

अकोले | रयत समाचार

(Religion) तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील श्री क्षेत्र राममाळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमा उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व अगस्ती साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अशोकराव देशमुख (आण्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा पारंपरिक उत्सव पार पडला.कार्यक्रमास देवस्थानाचे महंत विठ्ठलपंत गोंडे महाराज यांची उपस्थिती लाभली. उपसरपंच आणि बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक उद्योजक महिपाल देशमुख (बबनभाऊ) यांच्या पुढाकारातून, तसेच सद्गुरू यशवंतबाबा ग्रामविकास प्रतिष्ठान व स्थानिक भजनी मंडळांच्या सहभागातून भक्तीगीतांच्या स्वरांनी सारा परिसर दुमदुमला.

(Religion) गेल्या काही वर्षांत राममाळ तीर्थक्षेत्राचे रूपांतर आकर्षक पर्यटनस्थळात झाले आहे. नवीन मंदिर उभारणीसोबतच परिसरात पेव्हर ब्लॉक, बसण्यासाठी बाके, फुलांची बाग यांसारख्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. यामुळे केवळ तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील भाविकही या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.गावकरी आणि देवस्थान ट्रस्ट यांनी मिळून धर्म, संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्याचे काम हातात घेतले आहे. वर्षभर येथे गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, भजन संध्याकाळी यांसारखे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने साजरे होतात.

(Religion) याशिवाय, गावठाण ते देवस्थान दरम्यानच्या रस्त्याची अडचण दूर करण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी नवीन रस्ता मंजूर केला असून, तो लवकरच पूर्ण होणार आहे.श्री क्षेत्र राममाळ हे अकोले तालुक्याचे एक तेजस्वी तीर्थस्थान म्हणून भाविकांच्या मनात स्थान मिळवत असून, येथे येणारा प्रत्येक भक्त श्रद्धा, शांतता आणि अध्यात्माचा अनुभव घेऊन परत जात आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading