बीड | १४ सप्टेंबर | रयत समाचार
(Social) सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे लोकार्पण सोहळा नकताच उत्साहात पार पडला. या ग्रंथालयामुळे बीड जिल्ह्याच्या बौद्धिक आणि सामाजिक चळवळींना नव्या दिशेची चालना मिळणार असल्याचे मत धम्मसंगिनी रमा गोरख यांनी व्यक्त केले.
(Social) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क अभियानचे नेते डॉ. मिलिंद आव्हाड होते, तर सम्राट प्रतिष्ठानचे प्रवर्तक केशव वाघमारे, बाळासाहेब जावळे, राहुल वाघमारे, सुभाष साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. बीडमधील प्रतिष्ठानचे हितचिंतक व पाठीराखे यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
(Social) यावेळी धम्मसंगिनी रमा गोरख यांनी सांगितले, आपले समविचारी, समकालीन दोस्त, कुशल कामास सुरूवात करत आहेत… आणि हे महाराष्ट्रभर घडत आहे. दिर्घ पल्ल्याच्या संघर्षासाठी निवडणुकीपलीकडील नव्या हस्तक्षेपाचे महत्त्व लोकांना उमगले आहे. आपली जबाबदारी ओळखून समाजपरीवर्तनाच्या वाटचालीत लोक निश्चितच पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रंथालयाच्या माध्यमातून अभ्यास, संशोधन आणि सामाजिक प्रश्नांवरील संवादाची नवी दारे खुली झाली असून, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रकाश तरुणाईच्या वाटचालीला नवा वेग देईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
