अहमदनगर | २७.१ | रयत समाचार
(Social) मुलांच्या तुलनेत मुलींच्या लिंग गुणोत्तरात अपेक्षित सुधारणा साध्य करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी केवळ नियमित तपासण्यांवर विसंबून न राहता सापळा तपासणी आणि गुप्त माहितीवर आधारित लक्ष केंद्रीत कारवाई करण्यात यावी. संशयित आस्थापना व व्यक्तींविरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
(Social) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य सुधा कांकरिया, विधी समुपदेशक ॲड. सारिका सुरासे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.
(Social) डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यातील मुलींच्या लिंग गुणोत्तरात ठोस सुधारणा होण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक गांभीर्याने व दक्षतेने काम करणे गरजेचे आहे. गर्भधारणेपासून जन्मानंतरपर्यंत प्रत्येक मुलीची नोंद व निरीक्षण काटेकोरपणे करण्यात यावे. ज्या तालुक्यांमध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे, त्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून तालुका, ग्राम व जिल्हास्तरीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
ज्या तालुक्यांमध्ये जन्म व मृत्यू नोंदींचे प्रमाण कमी आहे, तेथे प्रलंबित नोंदी तातडीने पूर्ण कराव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी कारणांचा सखोल अभ्यास करून सुधारात्मक उपाययोजना राबवाव्यात व पुढील कालावधीत नोंदणीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, याची जबाबदारी निश्चित करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तसेच क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने संशयित रुग्णांचे लवकर निदान व तातडीने उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगत, तपासण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. सकारात्मक रुग्णांची नोंद ‘निक्षय’ पोर्टलवर अनिवार्यपणे करावी, असेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नोंदणीचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला दरमहा नोंदणीचे उद्दिष्ट देऊन किमान २५० नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी आरोग्य मित्रांची मदत घ्यावी व एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी आरोग्य विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती सादर केली. बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित विभागप्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
