Rip news | अकोले तालुक्यातील पहिले एमबीबीएस डॉक्टर शिवाजी बंगाळ यांचे निधन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अकोले | २२.११ | रयत समाचार

(Rip news) तालुक्यातील पहिले एमबीबीएस डॉक्टर आणि सेवाभावी वैद्यकीय कार्याची परंपरा जपणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजी गणपत बंगाळ यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मेहेंदुरी, इंदोरी, बहिरवाडीसह संपूर्ण प्रवरा परिसरात शोककळा पसरली.

(Rip news) मेहंदुरी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. बंगाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून १९६३ साली एमबीबीएस पदवी मिळवली. मोठ्या शहरातील संधी न स्वीकारता त्यांनी गावाकडे परत येत अत्यल्प साधनसामग्रीत अकोल्यात दवाखाना सुरू करून गरीब, शेतकरी जनतेची निःस्वार्थपणे आयुष्यभर सेवा केली. पैशाअभावी एकाही रुग्णाला उपचारावाचून परत जाऊ दिले नाही, हे त्यांच्या दवाखान्याची ओळख राहिली.

(Rip news) त्यांचे थोरले बंधू डॉ. बी.जी. बंगाळ यांच्यासह दोघांनीही अकोल्यातील वैद्यकीय सेवेला नवी उंची दिली. साधेपणा, अभ्यासू वृत्ती, मितभाषी स्वभाव आणि रुग्णांशी जिव्हाळ्याने संवाद साधण्याची त्यांची शैली नेहमीच कौतुकास्पद ठरली.

प्रवरेचे पाणी’ या आत्मकथनातून त्यांच्या संवेदनशील मनाचा आणि गाववाड्याप्रती असलेल्या नाळीच्या ओढीचा प्रत्यय येतो. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता. अनेकांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात.

डॉ. शिवाजी बंगाळ यांच्या निधनाने सेवाभावी वैद्यकीय कार्याचा एक प्रकाशस्तंभ मालवला असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची आठवण अकोले तालुक्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

Share This Article