बेळगाव | २५ मे | श्रीकांत काकतीकर
(Religion) संपूर्ण जगभर आज अस्थैर्याचे, संघर्षाचे आणि अराजकतेचे वातावरण आहे. माणूस शांतीसाठी आसुसलेला आहे. अशा काळात लोकांमध्ये शांती, सद्भावना आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारे कार्य करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने हाती घेतलेले विश्वशांतीचे कार्य अलौकिक असून, हे कार्य मानवतेला नवा मार्ग दाखवणारे आहे, असे प्रतिपादन अथणी येथील मोटगी मठाचे पूज्य श्री प्रभू चन्नबसव स्वामीजी यांनी केले.
(Religion) अनगोळ येथील बाबली गल्ली परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘विश्व कल्याणी भवन’ या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा उद्घाटन समारंभ एकात्मतेचा, अध्यात्मिक उन्नयनाचा आणि सेवाभावी विचारांचा जागर ठरला.
(Religion) या समारंभास माउंट आबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे विशेष कार्यकारी सचिव राजयोगी ब्र. मृत्युंजय भाई, हुक्केरी हिरेमठाचे पू. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, प्रजापिता ब्रह्मकुमारी बेळगाव विभागाच्या प्रमुख राजयोगिनी अंबिका दीदी, माजी महापौर शोभा सोमनाचे, निवृत्त न्यायाधीश ए.एस. पाश्चापुरे, के.एल.ई. संस्थेचे संचालक डॉ. राजशेखर, उद्योजक विनायक लोकूर, तसेच राजयोगिनी राजकुमारी दीदी (मुंबई), ब्र. नागेश भाई, अच्युत भाई, योगेश भाई, बसवराज भाई, आणि राजयोगिनी कला दीदी (सेडम), गिरजा दीदी (दिल्ली), ब्र. पियुष भाई (दिल्ली) आदी मान्यवर उपस्थित होते.
‘उज्वल भारतासाठी ब्रह्मकुमारींचा संकल्प’ : या प्रसंगी बोलताना ब्र. मृत्युंजय भाई म्हणाले, “प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतात आध्यात्मिक जागृती घडवली जात आहे. देशातील आणि जगातील हिंसाचार, भ्रष्टाचार, दुराचार यांचे उच्चाटन होऊन शांती, सहिष्णुता आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली सर्वत्र रुजावी यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “संस्थेच्या वतीने संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक, आध्यात्मिक व जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम कोणत्याही प्रतिफळाच्या अपेक्षेशिवाय नि:स्वार्थीपणे केले जात आहेत.”
‘मानव धर्माचे प्रतीक’ : कार्यक्रमात बोलताना पू. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी म्हणाले, “निस्वार्थपणे केलेल्या सेवेचे मूल्यमापन मानवतेच्या उन्नतीतून होते. प्रजापिता ब्रह्मकुमारींचे कार्य हे मानव धर्माचे प्रतीक असून त्यातून शांती, समाधान आणि सहजीवनाची प्रेरणा मिळते.”
लोकसहभागातून उभारलेले भवन : या समारंभात अनगोळ ब्रह्मकुमारी सेंटरच्या प्रमुख ब्र. विद्या दीदी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘विश्व कल्याणी भवन’ हे स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि संस्थेच्या सेवाभावातून उभारले गेले असून, हे भवन भविष्यात समाजोपयोगी कार्यांचे केंद्र बनेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने ब्रह्मकुमार, ब्रह्मकुमारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडले.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

