कोल्हापूर | २५.९ | रयत समाचार
संतसाहित्याचा अभ्यास, कीर्तन-प्रवचनातून वारकरी संप्रदायाचे विचार जनमानसात पोहोचविण्यात आपले आयुष्य समर्पित करणारे सुप्रसिद्ध पत्रकार, ज्येष्ठ कीर्तनकार आणि संतवाङ्मय अभ्यासक ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना गाथा अभ्यासक मारुती महाराज जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
२५ हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या शुभहस्ते येत्या २९ सप्टेंबर रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती पुरस्कार समिती प्रमुख अरुण जाधव यांनी दिली.
गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. यावेळी माजी खासदार सदाशिव मंडलिक, शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम महाराज अध्यासनाचे समन्वयक नंदकुमार मोरे, साहित्यिक-सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे वेदांतकेशरी मारुती महाराज तुंतुने यांचे प्रवचन व लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे कीर्तनही आयोजित करण्यात आले आहे.
मारुती जाधव तळाशीलकर हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचे खंदे अभ्यासक होते. त्यांच्या गाथा निरूपणाचे शिवाजी विद्यापीठाने प्रकाशन केले आहे. संतसाहित्य आणि सामाजिक समतेच्या विचाराचा प्रचार हे त्यांचे कार्य होते. त्यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार वारकरी परंपरेचे विचार रुजविणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. त्यानुसार, वारकरी संतांचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी अखंड राबणाऱ्या ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
