पंढरपूर | ०२ ऑगस्ट | प्रतिनिधी
(Religion) अभंग परंपरेतून मराठी भक्ती साहित्याची परंपरा समृद्ध करणाऱ्या लेखक, संपादक आणि प्रकाशकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंढरपूर येथील श्रीसंत कैकाडीबाबा विश्वपुण्यधाम मठ आणि अभंग प्रबोधिनी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “श्रीसंत कैकाडीबाबा साहित्य पुरस्कार” आणि “वै. सद्गुरु भोजलिंग महाराज साहित्य पुरस्कार” यासाठी साहित्यकृती मागवण्यात येत आहेत.
(Religion) या पुरस्कारांचा उद्देश लिंगायत, महानुभाव, वारकरी आणि इतर भक्तिपरंपरांचा वारसा जपणाऱ्या साहित्यकृतींना प्रोत्साहन देणे आणि समाजासमोर त्यांचे महत्व अधोरेखित करणे आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि पुस्तक असे असेल.
(Religion) पुरस्काराचा कालावधी आणि पात्रता : २०२२, २०२३ आणि २०२४ या तीन वर्षांत प्रसिद्ध झालेल्या भक्तीपरंपरेशी संबंधित साहित्यकृती या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत. कोणत्याही वाङ्मयप्रकारातील साहित्यकृती चालतील (उदा. चरित्र, काव्य, संशोधन, कादंबरी, निबंध, समीक्षा इ.). लेखक, संपादक किंवा प्रकाशक एकाहून अधिक पुस्तकांची शिफारस करू शकतात. मात्र, निवड केवळ एका साहित्यकृतीचीच होईल. पुस्तकाचे लेखन मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. अनुवादित पुस्तक असल्यास मूळ लेखक आणि अनुवादक अशा दोघांना एकच पुरस्कार दिला जाईल. प्रकाशन वर्ष पुस्तकात स्पष्ट नमूद असावे. नसल्यास त्याचा अधिकृत पुरावा जोडावा. शिफारसीसाठी पाठवलेली पुस्तके परत केली जाणार नाहीत.
इच्छुकांनी पुस्तकाच्या २ प्रती १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवाव्यात. ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर, मु.पो. घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर, पिन- ४१३३०९, संपर्क क्रमांक ८४५९२१२०२५.
पुस्तक पोहोचल्याची खात्री स्वतः करणे आवश्यक आहे. निवड समितीचा निर्णय अंतिम. या पुरस्कारांसाठी निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार निवड समितीकडे असून, निर्णयाबाबत कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. पुरस्कार लेखक, किंवा त्यांच्या सुचविलेल्या प्रतिनिधीस दिला जाईल. लेखक मयत झाल्यास त्यांच्या वारसांशी सल्लामसलत करून निर्णय घेतला जाईल.
हा साहित्य सन्मान मराठी भक्तिपरंपरेला नवसंजीवनी देणारा ठरणार असून, इच्छुक लेखक, संपादक, प्रकाशक आणि भक्तिपरंपरेचे अभ्यासक यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. भारत महाराज जाधव (श्रीसंत कैकाडीबाबा मठ) व ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर (अभंग प्रबोधिनी, महाराष्ट्र) यांनी केले.
