पुणे | २५ एप्रिल | प्रतिनिधी
(Religion) वारकरी संतांच्या साहित्याचा योग्य अन्वयार्थ लावून समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी, भेदाभेद भ्रम अमंगळ हे तत्व सांगणारे कीर्तनकार तयार व्हावेत, अंधश्रद्धा कर्मकांड विरहित भक्तीपरंपरा बळकट व्हावी, यासाठी पुणे येथील हिंगणगाव शिंदेवाडी येथे संत पिठाची स्थापना करण्यात आली.
(Religion) वारकरी परंपरा असणारे हरिभक्त परायण विकास महाराज लवांडे यांच्या संकल्पनेतून ही गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था उभी राहत आहे. कोणत्याही चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहणारे आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ देणारे देशाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते संत पिठाचे उद्घाटन झाले.
(Religion) महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, फडकरी, दिंडेकरी, संत साहित्याचे अभ्यासक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. ज्यात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले, विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूरचे विश्वस्त आणि दिंडी फकरी समाजाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर, तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू संस्थांचे विश्वस्त बापूसाहेब महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज, वारकरी संत साहित्याचे अभ्यासक भारत महाराज घोगरे गुरुजी आदी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार आल्यामुळे राजकारणातील ही काही मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी झालेल्या सोहळ्यात ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे कीर्तन झाले. या संत पिठामधून वारकरी संतांनी सांगितलेली सोपी भक्ती परंपरा विकसित होईल, असा आशावाद व्यक्त करीत सोन्नर यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
