मुंबई | २३.६ | रयत समाचार
(Rahul Narvekar Marathi) पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी भाषेचे चुकीचे वाचन केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नार्वेकर यांनी शोकप्रस्तावात मराठी भाषेची “चिरफाड” केली असून, त्यांनी लिहून दिलेले मराठीही नीट वाचता आले नाही, अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली.
(Rahul Narvekar Marathi) राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, आशा भोसले यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख नार्वेकर यांनी “दीनदयाल मंगेशकर” असा केल्याचे अत्यंत दुर्दैवी आहे. सभागृहात उपस्थित एकाही आमदाराने यावर आक्षेप घेतला नाही, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
(Rahul Narvekar Marathi) भाजपच्या राजकारणावरही निशाणा साधताना, खोगीरभरतीमुळे अनेकांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, सभागृहात ज्येष्ठ सदस्य उपस्थित असूनही कोणीही विरोध केला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका करत राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेचा सन्मान आणि शोकप्रस्तावाचे गांभीर्य याची जाणीव राज्याच्या नेतृत्वाने ठेवायला हवी होती. मात्र, संपूर्ण प्रक्रिया केवळ औपचारिकता म्हणून पार पडल्याचे चित्र दिसले.
महाराष्ट्र विधानसभेला गणेश वासुदेव मावळणकर, दत्तात्रय काशिनाथ कुंटे, बाळासाहेब भारदे, अरुण गुजराथी आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या अध्यक्षांची परंपरा लाभली असल्याचे सांगत, सध्याच्या अध्यक्षांच्या कामकाजाची तुलना त्या परंपरेशी होऊ शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले, मराठी भाषेवर केंद्राकडून हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, राज्यात परप्रांतीयांच्या वाढत्या प्रभावामुळेही मराठीवर दबाव आहे आणि आता विधिमंडळातही मराठीची अशी दुर्दशा होत असल्याने अधिक वेदना होत आहेत.
‘काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नव्हे, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
विधानसभेत आशा भोसले यांच्या निधनानिमित्त शोकप्रस्ताव मांडताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांबाबत आणि काही नावांच्या चुकीच्या उल्लेखाबाबत सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत भूमिका मांडत सरकार आणि विधानसभेच्या कामकाजावर टीका केली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


