ग्यानबाची मेख | २ ऑगस्ट | भैरवनाथ वाकळे
(Social) कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी होत असताना शहरातील काही सुज्ञ तरूणांनी अप्पूहत्ती चौकातील अहिल्यानगर महानगरपलिकेकडून नविन सुशोभिकरण होत असलेल्या ठिकाणी ‘सुंदर’ फ्लेक्सबोर्ड लावला. त्यावर ‘अत्यंत महत्वाची’ मागणी केली आहे. ही मागणी जिल्हा व राज्यभरातील अनेकांच्या मनासारखी आहे. या फ्लेक्सवर क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे हातात दांडपट्टा असलेले घोड्यावरील चित्र आहे. त्याखाली “किती शोभल चौकात !” अशी मनोगतवजा मागणी केलेली आहे. अनेक इतिहासप्रेमी व समाजपरिवर्तन कार्यात सक्रिय सहभागी कार्यकर्त्यांच्या मनातील ही भावना आहे. या चौकात भव्यदिव्य असा क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचा पुतळा बसवावा, अशी शहरातील जनतेची मागणी आहे.
सध्या सिध्दार्थनगर चौकात त्यांचा छोटा पुतळा १३.०९.२०२० साली बसविण्यात आलेला आहे. परंतु ही जागा खुप छोटी आहे. येथे काहीही सुशोभिकरण नाही. काही सामाजिक कार्यक्रम घ्यायचा झाल्यास आजूबाजूला पुरेशी मोकळी जागा नाही. दोन्ही बाजूने रस्ता असल्याने वाहतुक अडचण येते. भविष्यात रस्ता रूंदीकरण होणार असेल तर पुतळ्याला रूंदीकरणाचा धोका संभवतो. त्यामुळे आता… अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासक यशवंत डांगे यांनी ‘सुमोटो’ पुढाकार घेऊन शहरातील तरुणाईच्या मागणीला सकारात्मक साद देत. अप्पू हत्ती चौकात क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे भव्यदिव्य स्मारक म्हणून पुतळा उभारावा. त्यांना शहरातील परिवर्तनवादी जनता नक्कीच मार्क देईल.
(Social) १९८२ साली भारतात झालेल्या एशियाड गेम्ससाठी (आशियाई क्रीडा स्पर्धा) तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हात एक पाय उंचावून फुटबॉल खेळत असलेल्या हत्तीचे पिल्लू शुभंकर म्हणून घेण्यात आले होते. त्याच बोधचिन्हाच्या आधारे अप्पू हत्ती पुतळा करून चौकात उभारण्यात आला होता. नविन सिमेंट काँक्रीट रस्ता करत असताना अप्पू हत्ती पुतळा काढून टाकण्यात आला. आता येथे चौक सुशोभिकरण सुरू आहे.
(Social) क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे हे भारताच्या सामाजिक आणि क्रांतिकारी चळवळीतील एक थोर नेते, क्रांतीकारक आणि समाजसुधारक होते. त्यांची पुण्यामधे तालीम होती. ते देशभक्त तरूणांचे आयडॉल होते. १९ व्या शतकात महाराष्ट्रात दलित आणि बहुजन समाजाच्या सशक्तीकरणासाठी तसेच ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृतीसाठी मोलाचे कार्य केले. त्यांना “क्रांतिगुरू”, “लहूजी वस्ताद” किंवा “लहूजी नाईक साळवे” या नावांनी ओळखले जात. त्यांचे पूर्ण नाव लहूजी राघोबा साळवे असून जन्म १७९४ च्या सुमारास, पुरंदर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र येथे मांग जातीत झाला तर मृत्यू इ.स. १८८१ च्या सुमारास संगमवाडी पुणे येथे झाला.
क्रांतिकारक आणि लढवय्या नेते तर होतेच त्यात ते कुस्ती आणि युद्धकलेत निपुण होते. त्यांनी अनेक युवकांना शस्त्रविद्या शिकवून स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार केले. महात्मा जोतीराव व सवित्रीमाईंच्या समाजपरिवर्तन कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, वि.दा. सावरकरांचे वडील दामोदर सावरकर, तसेच लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्यावरही त्यांचा प्रभाव होता. फडके नावाच्या क्रांतिकारकावरही लहुजी वस्ताद साळवेंचा मोठा प्रभाव होता.
त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद, अन्याय, अज्ञान याविरुद्ध आवाज उठवला. महात्मा फुलेंना त्यांनी आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले. फुले दांपत्याला शूद्र-अतिशूद्र समाजाच्या उन्नतीसाठी लहूजी वस्ताद यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. ते स्वतःही एक विचारवंत आणि नेतृत्वक्षम समाजसुधारक होते. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आणि समाजातील उच्चवर्णीय अन्यायाविरुद्ध त्यांनी भक्कम भूमिका घेतली. त्यांचे वर्तन म्हणजे सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या एका क्रांतिकारक योद्ध्याचे उदाहरण आहे.
क्रांतिगुरू ही उपाधी समाजाने त्यांना दिली, कारण त्यांनी शोषितांचे नेतृत्व करत क्रांती घडवली. लहूजी वस्ताद साळवे हे केवळ क्रांतीकारक नव्हते, तर एका काळातल्या स्त्रीयांसह दलितांच्या न्याय हक्कासाठी लढणारे पहिले नेतृत्व होते. त्यांनी बळ, बुध्दी आणि नेतृत्व यांची त्रिसूत्री वापरून बहुजन समाजाला आत्मगौरवाची जाणीव दिली. ते आजही बहुजन समाजासाठी, तरूणाईसाठी प्रेरणास्रोत आहेत.
महाराष्ट्रात लहूजी वस्ताद साळवे यांचे पुतळे, विद्यालये, मैदाने, सांस्कृतिक संस्था यांना नावे देवून त्यांचे पुढील पिढ्यांसाठी आदर्श स्मरण ठेवले आहे. त्यांचे जन्मगाव असलेल्या पुरंदर पायथा येथे तसेच संगमवाडी समाधी येथे त्यांचे भव्य पुतळे उभारून स्मारक केलेले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेने त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी व कार्याला वंदन करण्यासाठी अप्पूहत्ती चौकात क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्यदिव्य स्मारक करावे, त्यांचा पुतळा उभारावा ही इमानदार जनतेची मागणी आहे.
हे ही वाचा : रयत समाचार ईपेपरमधे प्रसिध्द झालेले संबंधित वृत्त वाचा

