मुंबई | ०७ ऑगस्ट | गुरूदत्त वाकदेकर
(Press) मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांना जाहीर झाला. तशी त्यांची निवड करण्यात आली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. शाल, श्रीफळ, रुपये ११,०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(Press) वृत्तपत्र क्षेत्रातील एकूण ५४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या कुमार कदम यांनी विद्यार्थीदशेत असतानाच आपल्या पत्रकारितेचा प्रारंभ केला. रविवारच्या ‘लोकसत्ता’मध्ये ‘ज्ञान मंदिरातील लाचखाऊंना आवरा’ अशा शिर्षकाखाली सणसणीत लेख लिहून शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार त्यांनी चव्हाट्यावर आणला. शाळांतून प्रवेशासाठी घेण्यात येणार्या सक्तीच्या देणग्यांविरोधात सर्वप्रथम आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले होते.
(Press) रत्नागिरी जिल्ह्यातून प्रसिद्ध होणार्या ‘रत्नभूमि’ या दैनिकातून १९७२ मध्ये त्यांच्या पूर्णवेळ पत्रकारितेचा आरंभ झाला. मुंबईतील वार्ताहर म्हणून दहा वर्षे त्यांनी रत्नभूमिसाठी काम केले. याच काळात ‘साप्ताहिक मार्मिक’मधून महापालिकेत ‘एक नजर’ हे सदर त्यांनी अनेक वर्षे चालविले. आणिबाणीनंतर ‘हिन्दुस्थान समाचार’ या भाषिक वृत्तसंस्थेत त्यांनी १२ वर्षे वार्ताहर म्हणून काम केले. महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त) या संस्थेची १९९९ मध्ये स्थापना केल्यानंतर त्यांनी या संस्थेचे तसेच संस्थेच्या ‘महावृत्त डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे मुख्य संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. दैनिक पुढारी (कोल्हापूर), दैनिक तरुण भारत (बेळगाव) यांचा विशेष प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी मुंबईत दहा वर्षे काम पाहिले.
दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘मराठी मुलखात कोकण’ हे कोकणातील विविध विषयांवर सडेतोड भाष्य करणारे कुमार कदम यांचे सदर प्रचंड गाजले. जुलै २००१ ते सप्टेबर २०१४ अशी सलग १३ वर्षे स्तंभलेखक म्हणून त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले. इतक्या दीर्घकाळ एकाच प्रांतिक विषयावर सातत्याने लिखाण करण्याचा महानगरातील मोठ्या वृत्तपत्रातील एक विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
अनेक सामाजिक प्रश्नांवर आपल्या सडेतोड आणि रोखठोक लेखणीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणाऱ्या कुमार कदम यांनी कोकणातील रायगड येथे येवू घातलेल्या सेझ प्रकल्पाच्या धोक्याविषयीची माहिती महाराष्ट्र टाइम्सच्या ता.२२ ऑगस्ट २००५ च्या अंकातील सदरात ‘महामुंबईचे महाजाल’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध करून या विषयाला सर्वप्रथम वाचा फोडली.
सध्या ते सामाजिक स्तरावर अवयवदान विषयक जनजागृती करण्याचे व्यापक काम राज्यस्तरावर करत आहेत. शिवाय, अनेक सामाजिक उपक्रमांची धुराही ते सांभाळत आहेत. दूरदर्शनवर मराठी कार्यक्रमाची होणारी गळचेपी रोखण्यासाठी १९८३ साली मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. कुमार कदम यांच्या नेतृत्वातील मोर्चात सुधीर फडकेपासूंन अनेक दिग्गज त्यावेळी सहभागी झाले होते. परिणामी सह्याद्री वाहिनीवरून मराठी कार्यक्रमांना प्राधान्य मिळू लागले. ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना रयत समाचार टीमकडून विशेष शुभेच्छा.
हे हि वाचा : human | जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.