मुंबई | २३.१० | रयत समाचार
(Politics) विकासनिधीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांकडून मतांची खरेदी सुरू असल्याचा गंभीर आरोप करत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘हा राजकीय जुगाड तर आहेच, पण लोकशाहीची उघड थट्टा आहे,’ अशा शब्दांत त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
(Politics) आमदार पवार म्हणाले, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे तब्बल ८० हजार कोटी रुपये थकित आहेत. त्यांना न्याय मिळत नाही, सरकारकडे पैसे नाहीत असे सांगितले जाते. पण त्याच सरकारकडे सत्ताधारी पक्षाच्या ५४ आमदारांना प्रत्येकी ५ कोटी रुपये वाटण्यासाठी मात्र पैशांचा ओघ दिसतो. हे स्पष्टपणे अन्यायकारक आणि लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.
(Politics) पुढे बोलताना पवारांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली. जात, धर्म यांच्या आधारे भेदभाव करून आणि ‘खोक्यातून’ जन्म घेतलेल्या सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा सन्मान अपेक्षित करणं म्हणजे गुंडाकडून सद्वर्तनाचं प्रवचन ऐकण्यासारखं आहे, असा घणाघात त्यांनी केला.
राज्यातील सत्ताधारी आमदारांच्या निधीवाटप पद्धतीवरून आता राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा रंगली आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांच्या आक्रमकतेला नवा वेग मिळण्याची शक्यता आहे.
