नाशिक | ७ जून | प्रतिनिधी
(Politics) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त, पक्षाचे २५वे राज्य अधिवेशन नाशिकमध्ये २२ ते २४ जून २०२५ रोजी संपन्न होणार आहे. श्रीकृष्ण लॉन्स, बोधलेनगर येथील विविध क्रांतिकारकांच्या नावांनी सजलेल्या स्थळी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
(Politics) अधिवेशनाची सुरुवात २२ जून रोजी भव्य मोटारसायकल व वाहन रॅलीने होणार आहे. ही रॅली अशोक स्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांमार्गे द्वारका सर्कल ते श्रीकृष्ण लॉन्सपर्यंत पायी मिरवणुकीत रूपांतरित होईल. त्यानंतर जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, यामध्ये भाकपचे राष्ट्रीय सचिव व आयटकचे महासचिव कॉ. अमरजीत कौर, किसान सभा नेत्या कॉ. पाशा पद्मा, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, डॉ. राम बाहेती, कॉ. राजू देसले आदींचे मार्गदर्शन होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो असतील.
(Politics) २२ जून सायंकाळी ६ वाजता भारतीय संविधानावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘भारतीय संविधान: लोकशाहीचा गाभा’ या विषयावर ॲड. जयंत जायभावे यांचे मार्गदर्शन होणार असून, अध्यक्षस्थानी मा. सुरेश सावंत असतील.
२३ जून रोजी सायंकाळी ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो यांना ‘कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार ५१ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व शाल देऊन सन्मानित केला जाईल. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. रावसाहेब कसबे व कुमार केतकर असतील.
२३ जून रोजी सकाळी ११ वाजता विविध डाव्या विचारांच्या पक्षांचे प्रतिनिधी अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात मागील तीन वर्षांचा कार्य अहवाल राज्य सचिव सादर करतील आणि पुढील तीन वर्षांसाठीचे कार्यक्रम व रणनीती ठरवण्यात येतील. राज्यभरातून सुमारे ४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. २४ जून रोजी नवीन राज्य कार्यकारिणीची निवड होईल.
२२ व २३ जून रोजी रात्री इप्टा (भारतीय जननाट्य संघ) तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी निधी पक्ष सदस्य, सहानुभूतीदार व जनतेच्या योगदानातून उभारण्यात आला असून, या निमित्ताने विशेष स्मरणिकाही प्रसिद्ध होणार आहे.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा संयोजन समितीचे राज्य सहसचिव कॉ. राजू देसले, जिल्हा सचिव महादेव खुडे, सहसचिव दत्तू तुपे, शहर सचिव तल्हा शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

