(Politics) चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद खंडू पवार यांचे सरपंचपद अखेर अतिक्रमणाच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या आदेशामुळे तालुक्यामध्ये मोठी चर्चा रंगली.
(Politics) माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी सरपंच पवार यांनी चिचोंडी पाटील एस.टी. स्टँडवरील सार्वजनिक रस्त्यावर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडप उभारला. मात्र, गणेशोत्सव संपल्यानंतर तो मंडप न काढता त्याच ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून हरी ओम रिअल इस्टेट नावाने कार्यालय सुरू केले. याशिवाय मशिद इनाम देवस्थानच्या जागेत अनधिकृत बांधकाम तसेच ग्रामपंचायत निधीतून तयार रस्त्यावर जनावरांची दावण बांधल्याचे प्रकारही चौकशीत उघड झाले.
(Politics) ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पंचायत समितीमार्फत चौकशी अधिकारी नेमण्यात आले. तपासादरम्यान सरपंच पवार यांचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. बचावासाठी पवार यांनी अतिक्रमण नसल्याचा खोटा पंचनामा करून कागदपत्रे तयार केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि पुरावे तपासल्यानंतर पवार हे सरपंचपदासाठी अपात्र असल्याचा आदेश दिला.
या संपूर्ण लढ्यात ॲड. सचिन चांगदेव इथापे व ॲड. रणजीत ताकटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने युक्तिवाद केला. अखेरीस न्याय आणि कायदा हाच निर्णायक ठरला.