मुंबई | २० सप्टेंबर | रयत समाचार
(Cultural politics) नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’ सुविधेत वाढ करावी तसेच उर्वरित काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) ९२व्या संचालक मंडळ बैठकीत ते बोलत होते.
(Cultural politics) मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डी विमानतळाचे महत्त्व अधोरेखित करताना, येथे विमानांच्या पार्किंगचे दर कमी ठेवावेत, पंचतारांकित हॉटेल्ससाठी जागा निश्चित करून नामांकित कंपन्यांना आमंत्रित करावे, असे निर्देश दिले. यवतमाळ विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे तसेच खासगी कंपन्यांनी विमानतळ बंद केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
(Cultural politics) एमएडीसीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी विमानतळावरील रनवे व टॅक्सीवेच्या पुनर्पृष्ठिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑक्टोबर २०२५ पर्यंत नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल ब्लॉक कार्यरत होईल. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन प्रवासी टर्मिनल व एअर कार्गो कॉम्प्लेक्सचे कामही वेगाने सुरू आहे.
दरम्यान, मिहानमध्ये संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील भव्य गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडला (एसडीएएल) २२३ एकर जमीन वाटप करण्यात आले असून, १२,७८० कोटी रुपयांच्या प्रकल्पातून सुमारे ६,८२५ रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. त्याचबरोबर ६६० कोटींच्या गुंतवणुकीसह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट व डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे ८७५ अतिरिक्त रोजगार उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयामुळे नागपूर व विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, महाराष्ट्र संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.