श्रीरामपूर | १ सप्टेंबर | शफीक बागवान
Politics पालकमंत्र्यांनी पालकाची भूमिका राबवायची असते. तो समजदारही हवा. विखे यांनी निधीत आवडनिवड केली. सत्तेचा वापर हा लोककल्याणासाठी करायला हवा. विखे यांनी अडचणी निर्माण केल्या. सत्तेत राहून त्रास देणार असाल तर आंदोलन उभे करू. विखे ऐकत नसतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन प्रश्नांची सोडवणूक करू, असा सज्जड इशारा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिला.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. सभापती सुधीर नवले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, ज्येष्ठ संचालक सचिन गुजर, राजेंद्र पाअुलबुधे, सोन्याबापू शिंदे, श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गुप्ता, खंडेराव सदाफळ, किशोर बनसोडे, दशरथ पिसे, राजू चक्रनारायण, दीपक हिवराळे, लाल पटेल, ज्ञानेश्वर मुरकुटे, आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, ज.य.टेकावडे दौलतराव पवार, जयंत ससाणे, धुमाळ यांच्यासह अनेकांनी या बाजारसमितीच्या विकासात योगदान दिले. बाजारसमितीच्या विस्तारासाठी आता जमीन कमी पडत आहे. सार्वजनिक उपक्रमासाठी शेती महामंडळाच्या जमीन देण्याचा अजित पवार यांचा आदेश आहे. राज्यात येथील जनावरांचा बाजार मोठा होता. इतरांनी अतिक्रमण केल्याने तो बंद पडला, असे विखे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली.
मुरकुटे पुढे म्हणाले, आता बाजारसमितीने गाळे बांधावेत. यासाठी लागणारी जागा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू. विकासकामात पालकमंत्र्यांनी आवडनिवड करू नये. आंदोलन हे खूप मोठे शस्त्र आहे. अण्णा हजारे यांचे शस्त्र हे आंदोलनच आहे. कुणी अडवणूक करत असेल तर आंदोलनाच्या माध्यमातून आपण समोर जाऊ. विखेंच्या विरोधात आंदोलन उभारू. विखे ऐकत नसतील तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडवणीस यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडून घेऊ. पालकमंत्र्यांना काहीही करायचा अधिकार नाही, असे मुरकुटे यांनी ठणकावले.
राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात हे नेहमी श्रीरामपूरवर अन्याय करतात. श्रीरामपूरला येणाऱ्या पिण्याच्या पाण्यातून ते तिकडे शेती फुलवतात. गतवर्षी भर उन्हाळ्यात नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. विखे यांना पालकमंत्रीपदाची खुुमखुमी आहे. सत्ता आज आहे उद्या नाही. इतरांवर अन्याय नको. सत्तेच्या माध्यमातून विखे सर्वसामान्यांना त्रास देतात. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विखे ससाणे आम्ही एकत्र लढलो. सभापती पदासाठी बोलणे होऊनही विखे यांनी शब्द फिरविला. राजकारणातही शब्दाला किंमत असते. सभापती सुधीर नवले यांचे काम चांगले आहे.
माजी सभापती सचिन गुजर म्हणाले, काही आत्मसंतुष्ट आत्म्यांनी बाजारसमितीला त्रास दिला. असे विखे यांचे नाव न घेता टीका केली. अशोक कारखान्याने कधी लाखाच्या पुढे जाहिराती दिल्या नाहीत, मात्र बाजारसमितीने गतकाळात थेट २१ लाखापर्यंत जाहिराती वाटल्या, असा दीपक पठारे यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले. त्यांच्या काळात सव्वादोन लाखाच्या पुढे गाळे गेले नाहीत. मात्र स्वर्गीय जयंत ससाणे यांच्या सूचनेनुसार आपण गाळे विक्रीच्या जाहिराती देऊन हेच गाळे थेट २३ लाखाला दिले. कारण नसताना येथे चौकशी लावल्या. याचा विकासकामांवर परिणाम झाला. मोठ्या अडचणी वाढल्या. त्रास देणाऱ्यांना बाह्यशक्तीचा वरदहस्त असल्याची टीका गुजर यांनी राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केली.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनीही यावेळी अनेक मौलिक सूचना केल्या. बाजारसमितीने गाळे दिलेल्या संचालकांची नावे जाहीर करावीत. मागच्या सभेत या संदर्भात कारवाई करण्याच्या केलेल्या मागणीला अद्यापही यश आले नाही. बाजारसमितीत पिण्याचे पाणी, लघुशंकेची सोय नाही. शेतकऱ्यांना निवासस्थान नाही. दहा रुपयात जेवण कसे असते ते शेतकऱ्याला माहीत नाही. मोठमोठ्या घोषणा करून बाजारसमितीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप भोसले यांनी केला. सुरेश ताके यांनीही पाण्याच्या प्रश्नावर मुद्देसूद मांडणी केली.
यावेळी भाजीपाला, फळ, कांदा व्यापारी, आडत व्यापारी, भुसार व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी अशांचा सन्मानचिन्ह शाल आणि बुके देत सत्कार करण्यात आला. मोठी नॅपकिन आणि गुलाब पुष्प देत आलेल्या प्रत्येकांचे असे पहील्यांदाच स्वागत करण्यात आले.
अतिशय सुसूत्र पद्धतीने हा कार्यक्रम आखण्यात आला होता. बाजार समितीच्या संचालकांसह तालुक्यातील विविध सोसायटी ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिझेल उधारी तसेच उचल वसुली सुरू !
बाजारसमितीच्या पेट्रोलपंपावरून उधारीवर डिझेल नेलेल्या नानासाहेब शिंदे यांच्याकडील एक लाख रुपयांची वसुली सुरू झाली आहे. याशिवाय नंदा शेलार, राधाकृष्ण आहेर, अरुण खंडागळे, निवृत्ती बडाख, मुक्ता फटांगरे या संचालकांनी बाजार समितीतून उचल घेतलेल्या रकमेचीही वसुली सुरू झाली असल्याची माहिती यावेळी सभापती सुधीर नवले यांनी सभेत दिली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
Hi, I’m Jack. Your website has become my go-to destination for expert advice and knowledge. Keep up the fantastic work!