श्रीगोंदा | ८ फेब्रुवारी | माधव बनसुडे
(politics) श्रीगोंदा तालुक्यातील गट क्रमांक १७५९ मधील १० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या ऑस्ट्रेलियन मिशनच्या जमिनीच्या हस्तांतरण प्रकरणात तहसीलदारांच्या गैरकारभाराचा आरोप करत ता. १० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. संभाजीराव बोरुडे यांनी दिली.
(politics) बोरुडे यांनी सांगितले की, १९१२ साली चिमाजी कोथिंबीर यांच्याकडून खरेदी केलेल्या या जमिनीवर संस्थेने आरोग्य सेवा, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व समाजहितासाठी उपक्रम राबवले होते. १९७३ साली संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. मात्र, तहसीलदारांनी कायद्याची पायमल्ली करत सातबारा नोंदीत अनधिकृत मालकी हस्तांतरण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तहसीलदारांनी मंडल अधिकाऱ्यांना आदेश देऊन फेरफार क्रमांक ३२६ अंतर्गत दीपक नामदेव गायकवाड यांच्या नावावर मालकीची नोंद केली. यासाठी कोणतीही चौकशी किंवा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा जबाब न घेतल्याने हा निर्णय गैरप्रकाराचा असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.
(politics) या प्रकरणात दीपक गायकवाड, वैभव पारखे, संदिपान तुपारे व सतीश भालेराव यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतरही तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठ्यांना निलंबित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. आरोपींनी संशयास्पद पद्धतीने अटकपूर्व जामीन मिळवल्याचे बोरुडे यांनी नमूद केले.
तहसीलदार व दुय्यम निबंधक अधिकारी यांना पदावरून हटवण्याची मागणी करत १० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन होणार असल्याचे बोरुडे यांनी जाहीर केले. या आंदोलनात पीडितांसह अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
बोरुडे यांनी श्रीगोंदा पोलिसांनी उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि जामीन रद्द करण्यासाठी योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर