मुंबई | २२ ऑक्टोबर | गुरुदत्त वाकदेकर
Mumbai News नवरात्रोत्सवात देवीची आराधना केली जाते. या दरम्यान व्रत-उपवास आणि आराधना याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ दिवस, देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. त्याच प्रकारे या नऊ दिवसांत देवीला प्रत्येक दिवशी नऊ विशेष भोग किंवा प्रसाद अर्पित केल्याने देवी सर्व प्रकाराच्या समस्यांपासून मुक्ती देते, ही सर्व भक्तांची धारणा आहे. सारस्वतांनी तयार केलेला विशेष भोग म्हणजे त्यांचं साहित्य. तेच विशेष भोग म्हणून त्यांच्या रचना देवीच्या चरणी अर्पण करण्याची नामी संधी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात साधली.
“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आठवे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिक अभिनेते रविंद्र शंकर पाटील हे अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या सुविद्य सौभाग्यवती मेघा देखील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या त्यांचे ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचं स्थान प्राप्त केलेले उद्योगपती रतन नवल टाटा तसेच “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांचे सदस्य विक्रांत लाळे यांचे वडील मारुती लाळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये स्नेहा संजय फदाले, अशोक भाई नार्वेकर, सुनिता पांडुरंग अनभुले, महेंद्र रामचंद्र पाटील, गौरी यशवंत पंडित, प्रतिक्षा संजय संखे, सरोज सुरेश गाजरे, सानिका ज्योतीकुमार कुपटे, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, किशोरी शंकर पाटील, कल्पना दिलीप मापूसकर, स्वाती हेमंतकुमार शिवशरण, प्रा. स्नेहा केसरकर, आश्विनी सोपान म्हात्रे, प्रमोदिनी अनिल देशमुख, जयश्री हेमचंद्र चुरी, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी नारायणीचा जागर करणार्या आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मध्यंतरामध्ये चहा अल्पोपहारासोबत सुनिता अनभुले यांनी एकाच शब्दाला एकाच वाक्यात गुंफून शेर सादर करत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. किशोरी पाटील यांनी ‘अजीब दास्तां है’ ह्या गीताने वातावरण भारून टाकले. तसेच पूर्व संमेलनाध्यक्ष शैलेश निवाते यांनी त्यांनी रचना सादर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. “मराठी साहित्य व कला सेवा” चे संस्थापक अध्यक्ष तसेच पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांचा नुकताच लायन्स इंटरनॅशनल संस्थेकडून संपादकीय लिखाणासाठी सन्मान करण्यात आला. त्याच निमित्ताने प्रमोदिनी देशमुख यांनी त्यांचा भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार आवर्जून केला. बृहन्मुंबई महानगरपालिका विभागीय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त करणार्या बालकवी वेदान्त यशवंत पंडित याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन प्रमोदिनी देशमुख आणि वैभवी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या.
दुसर्या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित मराठी विनोदी रचना सुंदररीत्या सादर केल्या आणि दादरच्या राजा शिवाजी विद्या संकुलामध्ये हास्याचे फवारे उडाले.
संमेलनाध्यक्ष रविंद्र शंकर पाटील यांनी सादर केलेल्या फसलेल्या प्रेमाच्या हास्य कवितेवर त्यांच्या पत्नीनेही मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी सर्वांना शुभेच्छा देताना मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाचा आणि कवितांचा आनंद घेण्यासाठी बालकवी वेदान्त पंडित, साहित्यिका शितल चेंदवणकर, संजय संखे आवर्जून उपस्थित होते. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन अवधूत नार्वेकर आणि मेघा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी “वेळेत येणाऱ्या” सारस्वतांना सन्मानित केले. आपण सार्यांनीच वेळेच भान बाळगावे ह्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. स्वाती शिवशरण, किशोरी पाटील, सानिका कुपटे, प्रा. स्नेहा केसरकर आणि अशोक भाई नार्वेकर ह्या पाच जणांचा सन्मान संमेलनाध्यक्षपद भूषवत असलेल्या रविंद्र पाटील यांच्या उपस्थित तसेच नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे ह्यापुढे सगळेच वेळ चोख पाळतील ही अपेक्षा करण्यास हरकत नाही. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
दीपावली निमित्त ९ नोव्हेंबर २०२४ (अंदाजित) रोजी नऊवे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा अभिनेते, गायक तसेच कवी/गीतकार महेंद्र रामचंद्र पाटील असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर तर आभारप्रदर्शन नितीन सुखदरे यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रमोदिनी देशमुख, सुनिता अनभुले, शैलेश निवाते, नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.