नाशिक | १७.१० | रयत समाचार
माणूस हरतो आहे, माणूस मरतो आहे पण त्याच परिस्थितीविरुद्ध बंड करण्याची ताकद नारायण सुर्वे यांच्या कवितेने दिली. सुर्वेंची कविता मानवतेला कुशीत घेणारी, समाजातील अडथळे दूर करणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी नाशिकमध्ये केले.
सिडको येथील नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित साहित्य संमेलनात राज्यातील नामवंत साहित्यिकांना ‘नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कांबळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले, तर कवी रविकांत शार्दूल यांनी स्वागत केले. वाचनालयाचे खजिनदार दत्तू तुपे यांनी आभार मानले.
उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात नारायण सुर्वे यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकताना म्हटले की, जात, घर, गणगोत, आई-वडील ऊब न मिळालेल्या माणसाला माणूस समजले जात नाही. पण फूटपाथवर सापडलेला तोच नारायण सुर्वे, नंतर पद्मश्री पुरस्कार प्राप्त करून देशाच्या बुकात स्थान मिळवतो, हेच त्यांच्या कवितेचे बळ आहे.
त्यांनी पुढे सांगितले, भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर सुर्वेंनी लिहिलेल्या चार ओळी आजही मन हेलावून टाकतात,
बरे झाले नारायणा, तुला पद्मश्री लाभले,
देशाच्या बुकात, तुझे नाव तरी लागले.
या ओळींमधून त्यांच्या आत्मभानाची आणि सामाजिक वेदनेची जाणीव दिसते, असे कांबळे म्हणाले.
यावेळी कादंबरीकार सुरेश पां. शिंदे, कथाकार डॉ. अजीतसिंह चाहल, कवी अरुण नाईक, बालकवी प्रसेनजित गायकवाड यांना ‘नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ साहित्यिकांना प्रदान करण्यात आले.
