अहमदनगर | २५ एप्रिल | प्रतिनिधी
(Latest news) औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योजकांना वीज, रस्ते, पाणी यासह इतर मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याबरोबरच उद्योजकांच्या अडचणी समन्वयातून वेळेत सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत डॉ. आशिया बोलत होते.
(Latest news) बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, उद्योग अधिकारी अशोक बेनके, बालाजी बिराजदार यांच्यासह उद्योग मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
(Latest news) यावेळी डॉ. आशिया म्हणाले, औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सुरळीत वाहतुकीसाठी उपाययोजना करण्यात याव्यात. औद्योगिक क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे स्टॉलधारक व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आहेत. असे स्टॉल जप्त करण्यात यावेत. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलीस गस्त वाढवण्यात यावी. त्याठिकाणी पोलीस चौकी उभारण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
औद्योगिक क्षेत्राला पुरेशा प्रमाणात विद्युत पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफार्मर दुरुस्ती, विद्युत वितरणामध्ये येणारे अडथळे प्राधान्याने दूर करण्यात यावेत. परिसरामध्ये विद्युत सबस्टेशन उभारणीसाठी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी. क्षेत्रामध्ये असलेल्या ड्रेनेजची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करण्यात यावी. त्याचबरोबर कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावत परिसर स्वच्छ राहील यादृष्टीनेही आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ‘आयुष्यमान भारत योजने’तून ‘आरोग्याच्या सेवा’ उपलब्ध करुन देण्यात याव्यात. औद्योगिक क्षेत्राच्या भागामध्ये खासगी दवाखाने असल्यास त्यांच्या माध्यमातून सेवा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. या भागामध्ये असलेल्या विविध चौकांच्या सौंदर्यीकरणाची कामे सीएसआरच्या माध्यमातून करण्यात यावीत. औद्योगिक क्षेत्रामध्ये कौशल्यावर आधारित प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागेची तपासणी करण्याच्या सूचनाही डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी विषयाशी संबंधित माहिती दिली
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.