मुंबई | ८ एप्रिल | गुरुदत्त वाकदेकर
(Ipl) मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर, लखनौ सुपर जायंट्सने मंगळवारी त्यांच्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने तीन विकेट गमावून २३८ धावा केल्या. खूप प्रयत्न करूनही, कोलकाता २० षटकांत सात गडी गमावून फक्त २३४ धावा करू शकला.
(Ipl) पूरनने ३६ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली ज्यामध्ये त्याने सात चौकार आणि आठ षटकार मारले. मार्शने ४८ चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने वादळी खेळी करत अर्धशतक झळकावले.
(Ipl) मोठ्या धावसंख्येचा सामना करताना, कोलकाताला जलद सुरुवातीची आवश्यकता होती आणि त्यांनी ती मिळवली. सुनील नरेन आणि क्विंटन डी कॉक यांच्या जोडीने पहिल्याच षटकापासून चमत्कार करण्यास सुरुवात केली. या जोडीने पहिल्या षटकात १६ धावा काढल्या. दुसऱ्या षटकात १५ धावा झाल्या. ही धोकादायक दिसणारी जोडी आकाशदीपने तोडली. त्याने डी कॉकला नऊ चेंडूत १५ धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. डावखुऱ्या फलंदाजाने दोन षटकार मारले.
यानंतर, कर्णधार रहाणेने नरेनसह लखनौच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सहा षटकांत कोलकाताची धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात ९० धावा होती. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दिग्वेश राठीने नरेनचा डाव संपवला. नरेनने १३ चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
कर्णधार रहाणेला पुन्हा एकदा उपकर्णधार व्यंकटेश अय्यरने साथ दिली. त्यांनी मिळून लखनौच्या गोलंदाजांवर दबाव आणला आणि भरपूर धावा केल्या. लखनौसाठी धोकादायक बनत चाललेली ही भागीदारी शार्दुल ठाकूरने मोडली. त्याने कर्णधार रहाणेला तंबूचा रस्ता दाखवला. ठाकूरच्या फुल-टॉस बॉलवर पूरनने कॅच घेतला. त्याने ३५ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.
येथून कोलकाताचा डाव डळमळीत झाला. रमणदीप सिंग (१), अंगकृष रघुवंशी (५), आंद्रे रसेल (७), वेंकटेश अय्यर (४५) बाद झाले आणि कोलकाता विजयापासून दूर राहिला.
त्याआधी, मिचेल मार्शने आपल्या वादळी खेळीने लखनौसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. त्याने एडेन मार्करमसोबत पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. मार्करामला अर्धशतक झळकावता आले नाही आणि २८ चेंडूत ४७ धावा काढल्यानंतर हर्षित राणाने त्याला बाद केले. त्याच्यानंतर आलेल्या पूरनने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनीही ७१ धावा जोडल्या. आंद्रे रसेलच्या चेंडूवर मार्श बाद झाला. मार्शने ४८ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या.
मार्शच्या जाण्यानंतरही कोलकाताच्या गोलंदाजांना कोणताही दिलासा मिळाला नाही कारण पूरन चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत होता. तो शतकाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते पण शेवटच्या षटकांमध्ये त्याला स्ट्राईक मिळाला नाही आणि त्याचे शतक १३ धावांनी हुकले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.