मुंबई | ३१ मार्च | गुरुदत्त वाकदेकर
(Ipl) आयपीएल २०२५ च्या दहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने १६ षटकांत १६६ धावा करत सहज विजय संपादन केला.
(Ipl) सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा केवळ १ धाव करून धावबाद झाला. इशान किशन (२) आणि नितीश कुमार रेड्डी (०) हेही लवकर माघारी परतले.
(Ipl) अनिकेत वर्माने ४१ चेंडूत ७४ धावांची खेळी करत संघाला सावरले. हेनरिक क्लासेननेही ३२ धावा करत थोडाफार प्रतिकार केला. पण त्यांना इतर फलंदाजांचा फारसा पाठिंबा मिळाला नाही. सनरायझर्सचा डाव १८.४ षटकांत १६३ धावांवर संपुष्टात आला.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीत मिचेल स्टार्कने वादळी कामगिरी केली. त्यांनी ३.४ षटकांत ३५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनेही ४ षटकांत २२ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
१६४ धावांचे लक्ष गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. फाफ डू प्लेसिसने २७ चेंडूत ५० धावा फटकावत संघाला आघाडी मिळवून दिली. जेक फ्रेझर-मॅकगर्कने ३८ धावा तर अभिषेक पोरेलने नाबाद ३४ धावा करून विजयाच्या दिशेने संघाची वाटचाल सोपी केली.
मात्र, या सामन्याचा खरा आकर्षणबिंदू ठरला के. एल. राहुलचा आक्रमक खेळ. त्याने ५ चेंडूत १५ धावा ठोकल्या, ज्यात २ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. अखेरीस ट्रिस्टन स्टब्सने १४ चेंडूत २१ धावा करत सामना दिल्लीच्या बाजूने पूर्ण झुकवला. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सामनावीर ठरला. त्याने ३.४ षटकांत ३५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आणि हैदराबादच्या फलंदाजांना गारद केले.

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी