श्रीरामपूर | ९ एप्रिल | सलीमखान पठाण
(India news) तालुक्यातील मंडळाधिकारी भिमराज मंडलिक यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यात त्यांनी नागरिकांशी केलेले उद्धटवर्तन आणि शासकीय जबाबदाऱ्या झटकण्याचा प्रकार उघड झाला. विशेषतः उत्पन्नाचे दाखले आणि रेशनकार्डवरील सह्या नाकारल्याने अनेक नागरिकांचे कामे प्रलंबित राहिले असून, संतप्त नागरिकांनी या प्रकारावर सोशल मीडियावरून निषेध व्यक्त केला. व्हिडीओमध्ये भिमराज मंडलिक हे महिला भगिनींच्या प्रश्नांना दुर्लक्ष करत “ही माझी जबाबदारी नाही” असे म्हणताना दिसत आहेत. नागरिकांनी सांगितले की, कार्यालयात आलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांनाही त्यांनी अरेरावीच्या स्वरात बोलून अपमानित केले. शासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची वागणूक अपेक्षित नसल्यामुळे नागरिकांत प्रचंड संताप पसरला आहे.
(India news) रेशनकार्ड आणि उत्पन्नाचा दाखला हे गरजू आणि मध्यमवर्गीयांसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. त्यावरील विलंब किंवा सह्यांचा नकार यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडथळे निर्माण होतात. अशा वेळी मंडळाधिकारी भिमराज मंडलिक यांनी हे दस्तऐवज सह्या न करता थेट नकार दिल्यामुळे अनेक कुटुंबांची अडचणीत भर पडली. परिणामी, त्यांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
(India news) या प्रकरणी नागरिकांनी वरिष्ठ प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या असून, भिमराज मंडलिक यांच्या वागणुकीची चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी आहे. “शासन जनतेसाठी असते, अधिकाऱ्यांच्या अहंकारासाठी नव्हे”, अशी संतप्त भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. अनेकांनी या प्रकरणात प्रशासनाने हस्तक्षेप करून सामान्य नागरिकांचे हक्क अबाधित ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, मंडळाधिकारी भिमराज मंडलिक यांनी अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वेग मिळाला असून, आता ते स्थानिक मर्यादेच्या बाहेर जाऊन राज्यस्तरावरही लक्ष वेधून घेत आहे. हा प्रकार केवळ एका अधिकाऱ्याचा प्रश्न नसून, शासकीय यंत्रणेत असलेल्या उत्तरदायित्वाच्या अभावाचे द्योतक मानले जात आहे. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी आणि नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा शासकीय यंत्रणांवरील जनतेचा विश्वास ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंडळाधिकारी मंडलिक त्यांच्या कार्यालयात कधीच उपलब्ध नसतात. शुक्रवारपासून अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, विधवा, परितक्त्या व लहान लेकुरवाळ्या महिला भरउन्हात तलाठी ऑफिसला बसून आहेत. या लोकांना त्यांनी सांगितले बाहेर बसा. तीव्र उन्हात त्यांना बाहेर काढले.
मंडलिक हे कोणालाही जुमानित नाहीत. तहसीलदार प्रांत माझ्या खिशात आहेत, अशा पद्धतीने त्यांची भाषा असते. त्यामुळे ते कोणाच्या जीवावर एवढे मुजोर वागतात याची चौकशी करावी. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी न्याय द्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
हे ही वाचा : साहित्यवार्ता | नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र – टी. एन. परदेशी

