मुंबई | १९ सप्टेंबर | रयत समाचार
दुष्यंत कुमार स्मारक पांडुलिपी संग्रहालय, भोपाल यांच्यावतीने दिला जाणारा ‘राजुरकर राज स्मृती सन्मान’ यावर्षी मुंबई आकाशवाणीच्या विविध भारती केंद्राचे ज्येष्ठ उद्घोषक युनुस खान यांना जाहीर झाला.
संग्रहालय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार, २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता ‘राज सदन’, भोपाल येथे आयोजित कार्यक्रमात हा मानाचा सन्मान खान यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती करूणा राजुरकर यांनी दिली. याआधी हा सन्मान दिल्लीचे राकेश पांडे आणि भोपाळचे विजयदत्त श्रीधर यांना मिळाला आहे.
दमोह येथे जन्मलेले व सागर-जबलपूर येथे शिक्षण घेतलेले युनुस खान मागील सव्वादोन दशके मुंबई विविध भारतीमध्ये कार्यरत आहेत. या काळात त्यांनी लता मंगेशकर, ओ.पी. नैयर, आमिर खान यांच्यासह अनेक दिग्गजांची मुलाखत घेतली आहे. ‘जिया जले’ (गुलजार), ‘नग्मे, किस्से, बातें, यादें’ (आनंद बक्षी), ‘उम्मीदों के गीतकार शैलेन्द्र’ आणि मेय मस्क यांच्या A Woman Makes a Plan या पुस्तकाचा ‘जब औरत सोचती है’ या नावाने अनुवाद अशा अनेक नामवंत पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या लेखणीतून झाले आहे. त्यांनी दैनिक भास्कर मध्ये तब्बल ११ वर्षे ‘स्वर पंचमी’ या लोकप्रिय स्तंभाचे लेखनही केले.
सन्मानाचे प्रणेते राजुरकर राज यांचा जन्म २७ सप्टेंबर १९६१ रोजी बैतूल जिल्ह्यातील गोधनी येथे झाला होता. त्यांनी आकाशवाणी उद्घोषक म्हणून काम करत असतानाच स्वतःच्या निवासातील एका खोलीतून ‘दुष्यंत कुमार स्मारक पांडुलिपी संग्रहालय’ सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांतून उभे राहिलेले हे संग्रहालय आज देशभरातील साहित्यिकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या निधनानंतरही संग्रहालयाची वाटचाल अविरत सुरू आहे.
युनुस खान यांच्या सन्मानामुळे साहित्य-संस्कृती आणि आकाशवाणी क्षेत्रातील नवा दुवा जोडला गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.