संगमनेर | १२.१२ | नितीनचंद्र भालेराव
(India News) दलित स्त्रीवाद, मानवतावाद, जातिभेद व लिंगभेद या ज्वलंत मुद्यांवर मार्गदर्शक ठरणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान – २०२५ आज हैदराबादमध्ये होत असून, यंदाचे व्याख्यान सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लेखिका व संशोधक प्रा. शैलजा डी. पाईक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
(India News) बोराबांडा येथील दलित अभ्यास केंद्राच्या सीडीएस सभागृहात, पाचव्या मजल्यावर आज १३ डिसेंबर रोजी दुपारी २.०० वाजता या महत्त्वपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील बहुविध वंचनांवर प्रकाश टाकणारे हे व्याख्यान मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांना आकर्षित करत आहे.
(India News) प्रा. पाईक या महिला–लिंग–लैंगिकता अभ्यास, समाजशास्त्र आणि आशियाई अभ्यास विषयातील चार्ल्स फेल्प्स टाफ्ट विशिष्ट संशोधन प्राध्यापिका आहेत. त्यांना मॅकआर्थर फाउंडेशनची २०२४ ची “जीनियस” फेलोशिप मिळाल्याने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे विचार अधिक ठळक झाले आहेत.
दलित अभ्यास, जात-अभ्यास, आधुनिक दक्षिण आशिया, मौखिक इतिहास, मानवतावाद अशा बहुआयामी क्षेत्रांमध्ये त्यांनी मौलिक संशोधन केले आहे. ज्ञानाचे वसाहतीकरण दूर करण्याच्या संकल्पनेला त्यांनी नवीन बौद्धिक दिशा दिली आहे.
प्रा. पाईक यांचा संशोधन वारसा
त्यांच्या ‘दलित महिला शिक्षण: आधुनिक भारतातील दुहेरी भेदभाव’ (2014) या पुस्तकात दलित महिलांच्या शैक्षणिक संघर्षाचे वास्तव मांडले आहे.
तर ‘द वल्गरिटी ऑफ कास्ट: दलित, लैंगिकता आणि मानवता आधुनिक भारतातील’ (2022) या अभ्यासग्रंथात त्यांनी महाराष्ट्रातील जात, वर्ग, लिंग, लैंगिकता आणि लोकप्रिय संस्कृतीतील राजकारणाचे सम्यक विश्लेषण केले आहे.
या ग्रंथातून आद्य नृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर, राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर, तसेच कांताबाई सातारकर व सुरेखा पुणेकर अशा मोलाच्या महिला कलावंतांच्या ऐतिहासिक योगदानाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे. हे व्याख्यान दलित स्त्रीवाद आणि मानवतावादाच्या नव्या दिशांचा वेध घेणारे ठरणार असून, समाजपरिवर्तनाच्या प्रश्नांवर नवे बौद्धिक आयाम उघडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.