भारतीय स्वातंत्र्याच्या सतरा वर्षे आधी सोलापूरने हे चार दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले होते
समाजसंवाद | १३ फेब्रुवारी | सरफराज अहमद
(india news) राहूल सोलापूरकर यांच्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण ही चर्चा दोन मुद्यांभोवती केंद्रीत राहीली आणि संपली. राहूल सोलापूरकर हे मागील पंधरा-वीस वर्षांपासून सातत्याने जाणिवपूर्वक इतिहासात प्रक्षेप करत आले आहेत. याविषयी ते योजनाबध्दरितीने काही भाषणं अनेक ठिकाणी देत होते. राजर्षी शाहूंच्या इतिहासावर आधारीत एका मालिकेत त्यांनी काम केले होते. त्यावरुन अनेक ठिकाणी त्यांना भाषणासाठी आमंत्रीत केले होते. ही भाषणे देताना शाहूंच्या इतिहासाविषयी सौम्यपणे काही प्रक्षेप करण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक वर्षे चालवला होता. पण शाहूंच्या इतिहासाविषयी सातत्यपूर्ण लिखाण करणाऱ्या अभ्यासकांमुळे त्यांना हे यश आले नाही. सोलापूरकरांनी साधारण दोनेक वर्षापुर्वी सोलापूरच्या मार्शल लॉविषयी विस्तृत असे भाषण दिले होते. कथात्मक शैलीत इतिहास मांडण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून त्यांनी केला होता.
(india news) महात्मा गांधीनी सन १९३० च्या एप्रिलमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. काही काळातच या चळवळीचे लोण भारतभर पसरले. सोलापूर शहर त्याला अपवाद नव्हते. ही चळवळ थांबवण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी गांधींना अटक केली. ५ मे १९३० रोजी रात्री १०.३० वाजता गांधीच्या अटकेची बातमी सोलापूरात पोहोचली. त्यानंतर सोलापूरात आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याला घाबरुन इंग्रज प्रशासनातील महत्वाचे आधिकारी सोलापूर सोडून पळून गेले. ९ मे ते ११ मे असे चार दिवस सोलापूरात इंग्रज नव्हते.
त्याकाळात सोलापूर काँग्रेसने शहरावर आपले शासन स्थापित केले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या सतरा वर्षे आधी सोलापूरने हे चार दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले होते. पुढे इंग्रजांनी मार्शल लॉ पुकारुन हे स्वातंत्र्य संपवले. यातील प्रमुख पुढाऱ्यांना अटक करण्यात आली.
त्या चळवळीतील प्रमुख नेते आणि लक्ष्मी मिलच्या चिमणीवर चढून तिरंगा फडकावत ज्यांनी सोलापूरच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती, ते डाव्या विचारांचे पत्रकार कुर्बान हुसैन यांच्यासह मलप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे यांना पुढे फाशी देण्यात आली. हा इतिहास जागतिक पातळीवर ‘पॅरिस कम्युन‘च्या धरतीवर ‘सोलापूर कम्युन’ म्हणून गौरवला गेला.
सोलापूरच्या या महान इतिहासाला राहूल सोलापूरकर यांनी एक जातीय दंगल ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक कपोलकल्पित संदर्भ वापरले होते. सोलापूरच्या या दैदिप्यमान इतिहासाचा राहुल सोलापूरकरांनी यापुर्वी मोठा अपमान केला होता. पण स्थानिक इतिहासाविषयी सोलापूरवासियांना आस्था नसल्याने सोलापूरकर यातून सहिसलामत निसटले.
वर्तमानाच्या माऱ्यात निसटणारी एक नोंद…

हे ही वाचा : ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ सरफराज अहमद यांचे आवर्जून वाचावे असे नवे पुस्तक – किशोर मांदळे
Contents
poem:तुझ्या दाराहून जाता…पत्रकार, कवी, गीतकार प्रकाश घोडके यांची MILESTONE कविता