सॅम्युएल नॉट, मिसेस नॉट, गॉर्डन हॉल आणि ल्युथर राईस ही त्या मिशनरींची नावे
समाजसंवाद | ११ फेब्रुवारी | कामिल पारखे
(india news) १२ फेब्रुवारी; याच दिवशी १८१३ रोजी मुंबई बंदरावर चार अमेरिकन मिशनरींचे आगमन झाले आणि भारतात आधुनिक सामाजिक क्रांतीचे पर्व सुरु झाले. सॅम्युएल नॉट, मिसेस नॉट, गॉर्डन हॉल आणि ल्युथर राईस ही त्या मिशनरींची नावे. या मिशनरींनी लगेचच आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा मुंबईत सुरु केल्या, केवळ मुलींसाठी पहिली शाळा १८२४ साली सुरु केली.
Contents
(india news) १२ फेब्रुवारी अमेरिकन मराठी मिशनचा वर्धानपनदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त नगर येथे ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. सावित्रीबाई फुले यांनी सिंथिया फरार मॅडमच्या ज्या शाळेत अध्यापनाचे धडे घेतले असतील त्या क्लारा ब्रुस शाळेत हा कार्यक्रम होत आहे.
(india news) मुंबईतल्या अमेरिकन मराठी मिशनच्या एका तुकडीने २० डिसेंबर १८३१ रोजी नगर येथे तंबू ठोकला आणि या शहरात अमेरिकन मराठी मिशनचे कार्य सुरु झाले, ते आजतागायत चालू आहे. या पहिल्या दिवसापासून तो या केंद्राच्या १८८१च्या सुवर्णमहोत्सवापर्यंतच्या कार्याच्या हृदयस्पर्शी आठवणी त्याकाळात अमेरिकेत परतलेल्या रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिल्या होत्या. पुण्यातील ज्येष्ठ संशोधक अशोक एस. हिवाळे यांनी त्या लिखाणाचा मराठीत पुढीलप्रमाणे अनुवाद केला आहे. तो अनुवाद संक्षिप्त रुपात येथे मी देत आहे : मोहरीचा दाणा वाढला आणि त्याचे मोठे झाड झाले.
“१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणाऱ्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. ते आता वयाच्या ७८ व्या वर्षी अमेरिकेत मिसेस रीड यांच्यासोबत आहेत. त्यांच्या स्मृती अजूनही ताज्या आहेत, त्यांनी आम्हांला त्या सुरुवातीच्या दिवसांत घडलेल्या लहानसहान घटनांच्या विविध आठवणी सांगितल्या आहेत”
“१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या आगामी ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते. मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या नगर येथील कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे अशी मी अपेक्षा करीन.
२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता. मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते. आमची सुरुवात आशादायी होती – शनिवारी आम्ही नगरला आलो आणि रविवारी आर्मी सर्जन डॉ. ग्रॅहॅमसोबत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेलो. ते दर शब्बाथ दिवशी सकाळी आमंत्रण देऊन गरीब, लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोगी यांना बोलवायचे. ते लोक तेथे जमले की, ते त्यांना जो एकटाच त्यांची आध्यात्मिक दुर्बलता दूर करू शकतो अशा एका महान वैद्याविषयी सांगायचे. आणि त्यांच्या उपासमारीने भुकेजलेल्या कृश शरीरांसाठी तांदूळ आणि धान्याचा पुरवठाही करायचे. थोडक्यात सांगायचे तर येथे आमचे मिशनकार्य सुरू झाले.
जानेवारी १८३३ चा पहिला सोमवार, हा दिवस माझ्या चांगला आठवणीत राहील. मला माझ्या जर्नलमध्ये त्या दिवसाविषयी लिहिलेली खालील टिपणी आढळते : ‘‘भारतात मी पाहिलेला हा सर्वांत पवित्र आणि मनोरम दिवस आहे. आमच्या स्थानिक भाषेतील सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी तीन अनोळखी लोक उपस्थित होते. ते म्हणाले की, ‘‘आम्ही ‘नवीन मार्गाविषयी’ विचारपूस करण्यासाठी आलो आहोत.’’ याचा परिणाम असा झाला की, यांपैकी बारा जणांना मंडळीमध्ये सभासद म्हणून स्वीकारण्यात आले. चौघांना फेब्रुवारीमध्ये आणि इतरांना आमची स्वतंत्र मंडळी स्थापन झाल्यावर पुढील मार्चच्या ६ तारखेला. आम्ही तोपर्यंत मुंबईच्या मिशन चर्चची शाखा म्हणून अस्तित्वात होतो.
मंडळी स्थापन होण्यापूर्वी मिशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात चौदा सदस्य होते. त्यात सर्वांत खालच्या जातीचे दहा हिंदू, गरीब आणि असहाय होते. आता मला अहमदनगर येथील मंडळीमध्ये सर्व जातींचे तीनशे सदस्य आढळतात आणि त्यात उच्च जातीतील लोकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्या सुरुवातीच्या काळातील आमचे बहुतेक सत्यशोधक लवकरच हे दाखवून देतील की, आम्ही शिकवलेल्या धर्मात त्यांना जे स्वारस्य होते ते केवळ नोकरी मिळवण्यासाठी किंवा काही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नव्हते आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला. जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल. या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले. लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले. काही वाचायला शिकल्या. सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला. आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही. स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते. हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही. त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती. बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले.
दुसऱ्या एका प्रसंगात असा शोध लावला होता की, दुसऱ्या एका शाळेतील पुस्तकात येशू ख्रिस्ताचा धर्म शिकवला जातो आणि आम्ही त्यांना त्यांच्या वडिलांचा धर्म सोडण्यास भाग पाडणार आहोत असा धोक्याचा इशारा दिला होता. यामुळे एक धोक्याची घंटा वाजली आणि कोकरे पुन्हा विखुरली गेली. परंतु या प्रकरणात इतरांप्रमाणेच धोक्याच्या घंटेचा हा नाद लवकरच मंदावला. बहुतेक विद्यार्थी परतले आणि शाळा चालू झाल्या आणि आणखी एक बळकट दृष्टान्त मला दिसतो तो म्हणजे अहमदनगरमधील ईश्वरविज्ञान पाठशाळा! माझ्या पहिल्या बॉईज स्कूलशी तुलना करता हे चित्र किती परस्परविरोधी आहे. अर्धा डझन गरीब ओबडधोबड कपडे घातलेले विद्यार्थी जमिनीवर मांडी घालून बसले आहेत आणि वाळूच्या बोर्डवर अ, आ, इ, ई लिहीत आहेत.
मला त्या गावांची (आणि त्यांच्यापलीकडील गावांतील अनेकांची) आठवण होते. माझ्या पहिल्या भेटीत मी त्यांना पहिल्यांदाच येशूची कथा आणि त्याचे प्रेम सांगितले होते. यांपैकी काही गावांमध्ये लोकांनी पाहिलेला मीच पहिला गोरा माणूस होतो. माझ्या जर्नलमध्ये लिहिले आहे, ‘‘मिशनच्या पहिल्या तीन वर्षांत सोळा प्रचारदौरे करण्यात आले, २२०० मैलांचा प्रवास केला, आणि २३० गावांना भेटी दिल्या, त्यांपैकी बहुतेकांनी मिशनरीचा आवाज यापूर्वी कधीही ऐकला नव्हता.’’ हे दौरे नगर केंद्रातून सुरू करून जुन्नर, औरंगाबाद, जालना, हैद्राबाद, कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, महाबळेश्वर डोंगर आणि मध्यंतरीच्या सर्व प्रमुख गावांपर्यंत विस्तारले होते.
मी आता लोणी, राहुरी, शिरुर, सातारा, सोलापूर आणि इतर सर्वच गावांत या माझ्या भेटींची पुनरावृत्ती करू शकलो, तर मला किती आनंददायी विरोधाभास आढळेल. लाल समुद्र पार केला आहे. प्रगतीतील पूर्वीचे अडथळे दूर केले, एवढेच नाही तर त्यांची तीव्रता कमी झाली आहे. जातीची लोखंडी पकड सैल झाली आहे. निर्दयी भटभिक्षुकांच्या जुलूमजबरदस्तीचे सामर्थ्य खूपच कमी झाले आहे. ख्रिस्ती मंडळीचा आदर केला जात आहे आणि तिच्या सदस्यांना आता वाळीत टाकीत नाहीत.
नंतरच्या तारखेच्या एका पत्रात, जवळ येत असलेल्या सुवर्णमहोत्सवी सम्मेलनाचा संदर्भ देत श्री. रीड म्हणतात : ‘‘ माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी निराशा ही आहे की मी भारतात सुरू केलेल्या कामात पुढे जाऊ शकलो नाही, म्हणजे तेथेच जगलो, मेलो आणि रणांगणावरच पुरला गेलो नाही.”
हे ही वाचा : ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ सरफराज अहमद यांचे आवर्जून वाचावे असे नवे पुस्तक – किशोर मांदळे