मुंबई | २८ जानेवारी | गुरूदत्त वाकदेकर
(india news) येथील सायन कोळीवाडा भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखेच्यावतीने पक्ष स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ता.२७ रोजी कॉ. तारा रेड्डी छायाचित्र अनावरण व तिळगुळ समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॉ. तारा रेड्डी यांच्या सोबत कार्य केलेल्या प्रा. डॉ. कुंदा प्र. नि. यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कॉ.तारा रेड्डी या साध्यासुध्या स्त्री नसून ‘अग्निशिखा’ होत्या, स्त्री चळवळीच्या प्रणेत्या होत्या. नंतरच्या पिढीने त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन काम केले. त्यांची प्रतिमा सर्वच शाखांमध्ये लावण्याचे डॉ.कुंदा यांनी आवाहन केले, जेणेकरून सर्वांना त्यांच्याकडून स्फूर्ती मिळेल.
(india news) कार्यक्रमाच्या सुरूवातीला अश्विनी, नंदा, शर्वरी, रूपाली, वैशाली, नरसु आदींनी प्रबोधन गीते गायली. कॉ. कविता निकाळजे यांनी सर्वांचे स्वागत केले तर डॉ. अनुराधा रेड्डी यांनी कॉम्रेड तारा रेडी यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल संक्षिप्त माहिती दिली.
प्रा. डॉ. कुंदा प्र. नि. यांनी तारा रेड्डी यांच्याबद्दल लहानपणापासून त्यांनी लढ्यामध्ये, चळवळीत कशा प्रकारे सहभाग घेतला होता, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची मानसिकता, गिरणी कामगार, विडी कामगार, सोबतचे केलेले काम, नगरसेवक असताना केलेल्या कामांबद्दलची माहिती सविस्तरपणे सांगितली.
उपस्थितांना तिळगुळ, सुंदर गुलाबाचे फुल व छोटी स्टीलची प्लेट भेट देण्यात आली. यावेळी कॉ. चारुल जोशी यांनी कम्युनिस्ट पार्टीमध्ये योगदान देणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या व्यक्तींची माहिती लिहून प्रदर्शन मांडले होते. कार्यक्रमाला सर्वधर्मिय व्यक्ती म्हणजे हिंदू, मुस्लिम, तामिळी, दलित आदी युवक, स्त्रिया सहभागी होत्या.
कार्यक्रमासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, लीलावती कांबळे, कॉ. विजय दळवी, दूरदर्शन विभागातील रिटायर्ड नरसिंह पोथकंठी, कॉ. बागवे, धारावीचे कॉ. शिंदे, कॉ. दादाराव पटेकर, कॉ. राजलक्ष्मी, कॉ. शंकर कुंची कुर्वे, कॉ. सोनावणे, कॉ. संजय तिवारी, कॉ. जी. गणेश, कॉ. दीपेश तावडे, कॉ. बाबा रिया, कॉ. भगवान धोत्रे, कॉ. सुभाष जाधव, कॉ. मावसा, कॉ. रिटा शेडगे उपस्थित होते.
सूत्रसंचालन कॉ. आबासाहेब गायकवाड तर आभार कॉ.राजू सोनवणे यांनी मानले.
हे ही वाचा : history | खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !