कोल्हापूर | २६.३ | रयत समाचार
(History) ‘इतिहास हा राष्ट्राचा आणि समाजाचा प्रबोधक असतो’ या ब्रीदवाक्याला आयुष्यभर जगणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्रातील एक भक्कम आधारवड हरपल्याची भावना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली.
(History) गेल्या तब्बल पाच दशकांपासून डॉ. पवार यांनी मराठा इतिहास संशोधन आणि लेखनाचे अविरत कार्य केले. छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ, महाराणी ताराबाई साहेब, शिवपुत्र राजाराम महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील तसेच सेनापती संताजी घोरपडे यांसारख्या इतिहासातील दुर्लक्षित पण पराक्रमी व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांना त्यांनी आपल्या संशोधनातून नवसंजीवनी दिली. विस्मृतीत गेलेल्या या इतिहासपुरुषांना त्यांनी पुन्हा प्रकाशझोतात आणले.
(History) विशेषतः राजर्षी शाहू महाराज स्मारक ग्रंथाचे लेखन व संपादन हे त्यांच्या कार्याचे मानदंड ठरले. शाहू महाराजांचे विचार आणि कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले होते. केवळ ग्रंथनिर्मितीपुरते मर्यादित न राहता, त्यांनी हा ग्रंथ देशविदेशातील विविध भाषांमध्ये प्रकाशित करून शाहू चरित्र जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा ध्यास घेतला.
डॉ. पवार यांनी राजर्षी शाहू स्मारक भवनाचे संचालक तसेच शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली इतिहास संशोधनाला नवी दिशा मिळाली.
इतिहास अभ्यासकांच्या नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक दीपस्तंभ होते. अनेक तरुण संशोधकांना त्यांनी इतिहास लेखन आणि संशोधनाच्या मूलभूत पायऱ्या शिकवल्या. त्यामुळेच ते मराठा इतिहासाचे ‘आधारवड’ म्हणून ओळखले जात होते.
इतिहास अभ्यासकांच्या नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक दीपस्तंभ होते. अनेक तरुण संशोधकांना त्यांनी इतिहास लेखन आणि संशोधनाच्या मूलभूत पायऱ्या शिकवल्या. त्यामुळेच ते मराठा इतिहासाचे ‘आधारवड’ म्हणून ओळखले जात होते.

