Environment | गोरक्षनाथ गडावर स्वच्छता मोहीम; 20 भोत कचरा संकलन

दुर्गवेडे ट्रेकर्स आणि अरण्या फाऊंडेशनचा उपक्रम

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Cleanliness Drive

नगर तालुका | संदीप बांगर

(Environment) डोंगरगण येथील गोरक्षनाथ गडावर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांकडून स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, गड परिसरात सर्वत्र कचरा साचलेला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन दुर्गवेडे ट्रेकर्स आणि अरण्या फाऊंडेशन, अहिल्यानगर या संस्थांच्या सदस्यांनी पुढाकार घेत, गड परिसरात शनिवार, ७ जून व मंगळवार, १० जून रोजी सकाळच्या वेळेत स्वच्छता मोहीम राबवली.

(Environment) गोरक्षनाथ गडावर दररोज अनेक भाविक, भक्तगण आणि निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. त्यांच्याकडून परिसरात कचरा फेकण्याचे प्रमाण अधिक असल्याने गडाचे पावित्र्य आणि सौंदर्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काही पर्यावरणप्रेमींनी कचरा संकलन करण्याची जबाबदारी घेतली.

(Environment) या मोहिमेत दुर्गवेडे ट्रेकर्स, अहिल्यानगर येथील अंकुश लोंढे, अक्षय चौधरी, रामदास शिंदे, किरण चेडे, पांडुरंग व्यवहारे, अक्षय वाघ, रामेश्वर गवळी, तसेच अरण्या फाऊंडेशन चे अमित गायकवाड, संदेश कपाळे, अजिंक्य सुपेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यासोबतच आशुतोष महाराज व नेवासा येथील काही नाथभक्त सुद्धा या उपक्रमात सहभागी झाले होते.
Environment
कचरा संकलित बॅगांसह सहभागी सदस्य
या मोहिमेदरम्यान एकूण २० गोण्या (भोत) कचरा संकलित करण्यात आला. त्यामधील ४ गोण्या केवळ प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरलेल्या होत्या. उर्वरित गोण्यांमध्ये प्लास्टिक पत्रावळ्या, डेकोरेशन साहित्य, चिप्सची पाकिटे यांसारखा मिश्र कचरा होता.
अजूनही गड परिसरात सुमारे २० गोण्या भरतील इतका कचरा शिल्लक आहे. मात्र, स्थानिक पातळीवर कचरा पुनर्वापर (रीसायकलिंग) युनिट उपलब्ध नसल्याने, हा संकलित कचरा ग्रामपंचायतीकडे न देता थेट नगर येथे नेण्यात येणार आहे.
प्लास्टिक बाटल्या खाजगी संकलकांना विकण्यात येणार असून, उर्वरित कचरा पुन्हा एकदा सॉर्ट करून नगर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे, अशी माहिती दुर्गवेडे ट्रेकर्सचे अंकुश लोंढे यांनी दिली.
या उपक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व सदस्यांचा देवस्थान ट्रस्ट, आशुतोष महाराज आणि सरपंच जालिंदर कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Environment
उपक्रमात सहभागी सदस्यांचा सत्कार करताना आशुतोष महाराज आणि सरपंच जालिंदर कदम.
या स्वच्छता मोहिमेमुळे गडाचे पावित्र्य आणि निसर्गसौंदर्य जपले जाईल, अशी भावना व्यक्त होत असून, पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून या टीमचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

हे हि वाचा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *